Jasprit Bumrah : बूम बूम बुमरा... कांगारु पळाले सैरावैरा...
बुमरा आणि कंपनीसह तमाम भारतीय क्रिकेटरसिकांना आज समाधानाची झोप लागेल. नाहीतर भारतात सकाळ होताच सुरु झालेल्या या कसोटी सामन्यात पहिल्या सत्रातील आपली फलंदाजीची दाणादाण पाहता पडलेले क्रिकेटरसिकांचे चेहरे दिवसाचा खेळ संपल्यावरचा स्कोअर पाहून मात्र पर्थमधल्या सायंकाळी आणि भारतातल्या दुपारी सूर्याच्या तेजासारखे उजळून निघाले. टॉसचं दान आपल्या पारड्यात आल्यावर बुमराने फलंदाजी घेतली. कॉन्फिडंट डिसिजन होता. बॅटिंगला ताकद देण्यासाठी त्याने अश्विन, जडेजासारखे दिग्गज स्पिनर बाहेर ठेवून वॉशिंग्टन सुंदरला अकरात घेतलं. सर्फराजच्या जागी जुरेल आला.
जैस्वाल शून्यावर माघारी परतल्यावर राहुलने आश्वासक सुरुवात केली होती. तब्बल १०९ मिनिटं टिकाव धरत त्याने ७४ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. पण, पर्थचा बाऊन्स, पेस हा भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणणारा आहे. त्यात आपण भारतातील खेळपट्ट्यांवरुन थेट ऑसी भूमीवर खेळतोय. समोर स्टार्क, हेझलवूड आणि कमिन्सचं त्रिकूट.
आपल्या बॅटिंगचा अनुभव पाहता कोहली आणि राहुलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. राहुलने टिकाव धरला, पण कोहलीला हेझलवूडच्या एका बाऊन्स झालेल्या चेंडूने फसवलं. मग आपली 'तू जा मी येतो'वाली लाईन लागली. सहा बाद ७३ वर धावफलक काळजात धडकी भरवत होता. पण, ऋषभ पंत आणि नवख्या नितीश रेड्डीने ४८ धावांची झुंजार भागीदारी केली. पंतने १४५ मिनिटे तर रेड्डीने ८७ मिनिटे किल्ला लढवला. रेड्डीचा स्ट्राईक रेट होता ६९चा. त्याने सहा चौकार, एक षटकार ठोकला. थोडा काऊंटर अटॅक गरजेचा होता. तरीही दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्याने आपण दीडशेत आटपलो.
आता जबाबदारी गोलंदाजांवर होती. कारण, इथे एक बाद ८० किंवा ९० असा प्रतिहल्ला जर कांगारुंनी दिवसाअखेरपर्यंत केला असता तर या सामन्यावरची पकड आपण गमावून बसलो असतो.
पण, रोहितच्या अनुपस्थितीत या सामन्यात कॅप्टन्सी करणाऱ्या बुमराने एखादा फलंदाज कॅप्टन्स नॉक करतो, तसा कॅप्टन्स स्पेल टाकला आणि कांगारुंची आघाडीची फळी कापून काढली. १० ओव्हर्स, तीन निर्धाव, १७ धावांत चार विकेट्स ही त्याची आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. त्याच्या पेस, बाऊन्स, लाईन अँड लेंथनी ऑसींना फेस आणला. धोकादायक स्टीव्ह स्मिथला आल्या आल्या त्याने घरी पाठवलं. तिथून मॅचवर आपण पुन्हा ग्रिप घेतली. त्याला सिराज, नवोदित राणानेही उत्तम साथ दिली. अर्थात सात बाद ६७ चा स्कोअर चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवणारा असला तरी सामन्यावरची पकड ढिली होता कामा नये. कारण, कॅरी, स्टार्क, चिवट खेळी करणारा लायन यांनी जर स्कोअर दीडशे पार नेला तर सामन्याची सूत्रे परत त्यांच्या हातात जातील. दीडशेत ऑलआऊट होऊनही आपण कांगारुंचा घामटा काढलाय. आता या घामाची ऑस्ट्रेलियाला आंघोळ कशी होईल हेच पाहायचंय.