Maharashtra News: मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra News: मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं जाणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Maharashtra News: मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ओळखला जाणार आहे. आज रायगड शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din 2023) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. किल्ले रागडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासोबतच प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली.
किल्ले रायगडावरील आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्यात. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली, तसेच मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचीही घोषणा केली.
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
- कोस्टल रोडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येईल
- प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा, प्राधिरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे असतील
- रायगडमधेही शिवसृष्टी उभारणार त्यासाठी 50 कोटींचा निधी
कुठून कुठपर्यंत असणार कोस्टल रोड?
मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.
सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यातील दोन बोगद्यापैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बोगदाचे काम 91 टक्के पूर्ण झालं आहे.
कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे 1600 वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे.
Coastal Road : कसा असणार मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?
- मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड आहे.
- दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीला असून प्रकल्पाचा 70 टक्के काम पूर्ण झालंय
- प्रिन्सेस ट्रीप फ्लावर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असेल
- एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
- यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
- कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत आणि 34 टक्के इंधन बचत होईल. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होईल