(Source: Poll of Polls)
IPL 2023 : चेन्नई पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन; 2008 पासून कोणत्या संघानं पटकावलं विजेतेपद, जाणून घ्या सविस्तर
IPL Winners List from 2008 to 2023 : आयपीएल 2023 च्या विजेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सनं नाव कोरलं आहे. IPL च्या पहिल्या हंगामपासून आतापर्यंत कोणत्या संघानं विजेतेपद पटकावलंय, जाणून घ्या सविस्तर.
IPL Winners List from 2008 to 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या मोसमाचा विजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ ठरला आहे. चेन्नई संघानं गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याची कामगिरी करत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरुवातीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत अतिशय रोमांचक ठरला. अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत चेन्नई आयपीएल 2023 चा विजेता ठरला.
चेन्नई पाचव्यांदा आयपीएल विजेता
चेन्नई सुपर किंग्स संघाने सर्वाधिक चषक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा चषकावर नाव कोरलं होतं, या यादीत आता चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यत इंडियन प्रीमियर लीगच्या 16 हंगामात कोण-कोणता संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
2008
आयपीएलच्या पहिल्या चषकावर राजस्थानने नाव कोरले होते. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न याने राजस्थानला जेतेपद मिळवून दिले होते. चेन्नईचा संघ उपविजेता ठरला होता. राजस्थानने चेन्नईचा तीन विकेट राखून पराभव केला होता. राजस्थान याला त्यानंतर एकदाही चषकावर नाव कोरला आले नाही. 2008 च्या विजेत्या राजस्थान संघात रविंद्र जाडेजा होता.
2009
डेक्कन चार्जस संघाने 2009 मध्ये चषकावर नाव कोरले होते. आरसीबीचा सहा धावांनी पराभव करत डेक्कन चार्जस संघाने चषकावर नाव कोरले होते. या संघामध्ये रोहित शर्मा याचा सहाभाग होता.
2010
चेन्नई संघाने प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला होता.
2011
धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. या हंगामात आरसीबी उपविजेता राहिली. चेन्नईने अंतिम सामन्यात आरसीबीचा 58 धावांनी विराट पराभव केला होता.
2012
गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने प्रथमच चषकावर नाव कोरले. चेन्नईनेच्या लागोपाठ तिसऱ्या विजयाचे स्वप्न केकेआरने मोडले. रोमांचक सामन्यात कोलकात्याने बाजी मारली होती.
2013
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पहिल्यांदाच चषकावर नाव कोरले. मुंबईने धोनीच्या चेन्नईचा पराभव करत चषक उंचवला. अंतिम सामन्यात १४९ धावांचे आव्हान चेन्नईला गाठता आले नाही. चेन्नईचा संघ 125 धावांपर्यंत मजल मारु शकला.
2014
गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकात्याने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. पंजाब संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला होता.. पण फायनलमध्ये त्यांना कोलकात्याचा अडथळा दूर करता आला नाही. 199 धावांचे आव्हान कोलकात्याने आरामात पार करत चषक उंचावला.
2015
चेन्नईचा पराभव करत मुंबईने चषकावर नाव कोरले. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 202 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल चेन्नईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने हा सामना 41 धावांनी जिंकला.
2016
आरसीबीचा पराभव करत हैदराबादने चषकवर नाव कोरले. हैदराबादची ही दुसरी ट्रॉफी असली तरी सनरायझर्स हैदराबादची ही पहिलीच ट्रॉफी आहे. भन्नाट फॉर्मात असलेल्या विराट कोहली याने या हंगामात चार शतकांच्या मदतीने 970 धावा चोपल्या होत्या. पण आरसीबीला हैदराबादकडून आठ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
2017
मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. पण यावेळी चेन्नई नव्हे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या सामन्यात मुंबईने अवघ्या एका धावेने विजय मिळवला. मुंबईविरोधात चेन्नईचा संघ नव्हता.. पण धोनी होता.. धोनी पुणे संघाचा कर्णधार होता.
2018
2010 आणि 2011 नंतर चेन्नईचा अनेकवेळा फायनलमध्ये पोहचला होता. पण त्यांना जेतेपद मिळवता आले नव्हते. पण 2018 मध्ये चेन्नईने हैदराबादचा पराभव करत चषकावर नाव कोरले होते. दोन वर्षाच्या बंदीनंतर चेन्नईने दणक्यात पुनरागमन केले होते. 2018 च्या फायनलमध्ये चेन्नईने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला होता.
2019
मुंबईने चेन्नईचा पराभव करत चौथ्या चषकावर नाव कोरले. मुंबईने फायनलमध्ये तिसऱ्यांदा चेन्नईचा पारभव केला. रोमांचक सामन्यात मुंबईने चेन्नईचा अवघ्या एका धावेने पराभव केला होता. अखेरच्या चेंडूवर मलिंगाने शार्दूल ठाकूर याला क्लिनबोल्ड करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले.
2020
मुंबईने पिहिल्यंदाच धोनीशिवाय फायनल जिंकली. मुंबईने पहिल्या चारही चषकावर धोनीच्या संघाचा पारभव करत नाव कोरले होते. 2020 मध्ये पहिल्यांदाच मुंबईने दुसऱ्या संघाचा पराभव करत चषक जिंकला. दिल्लीचा पराभव करत मुंबईने पाचव्यांदा चषकावर नाव कोरले.
2021
धोनीने चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले. फायनलध्ये कोलकात्याचा 27 धावांनी पराभव करत धोनीने जेतेपद जिंकले.
2022
गुजरात आणि लखनौ या दोन संघाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता. या दोन्ही संघाने पहिल्या झटक्यात प्लेऑफ गाठली. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने चषकावर नाव कोरले. गुजरातने राजस्थानचा सात विकेटने पराभव करत चषकावर नाव कोरले.
2023
चेन्नई आणि गुजरात संघामध्ये रंगलेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला. चेन्नई पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं.