Maharashtra Assembly Election 2024 : भाजपकडून अपक्षांना जाळ्यात ओढण्यासाठी ६ नेत्यांवर साखरपेरणीची जबाबदारी
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपने अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडी? (mahavikas Aghadi) कोण सत्ता स्थापन करणार? याकडे अवघ्या राज्यभराचे लक्ष लागले आहे. तर विधानसभेच्या निकालापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आता भाजपने (BJP) अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून सहा नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना गळाला लावण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुती समोर आहे.
'या' सहा नेत्यांवर जबाबदारी
त्यातच आता भाजपकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी होणाऱ्या उमेदवारांवर करडी नजर आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप आणि महायुतीकडून फिल्डिंग लावली जात आहे. आता अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यात नेमकं कुणाला यश येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अपक्षांचं मार्केट वाढलं
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल्स समोर आले आहेत. यामध्ये महायुतीच्या अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीला 150 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला एक्झिट पोलमध्ये 110 ते 120 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दोन्हीकडील नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न निकालाआधीच सुरु केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST