गोव्यातही लुबान वादळाचा तडाखा, पर्यटकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने आज दुपारी दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते.

पणजी : लुबान वादळाच्या परिणामामुळे सुमद्र खवळलेला असून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पर्यटन खात्याने याची गंभीर दखल घेत 14 ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांनी समुद्रात ऊतरु नये अशी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
लुबानच्या फटक्यामुळे आजही गोव्यातील किनारे पाण्याखाली गेले आहेत. आज दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते.
कालप्रमाणे आज देखील पाणी किनाऱ्यावर आल्याने या किनारपट्टीवरील शॅक पुन्हा एकदा पाण्याखाली गेले. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, माजोर्डा, उतोर्डा, काणकोण तर उत्तर गोव्यात कांदोळी, कळंगूट, सिकेरी, वागातोर, अंजुणा, मोरजी आणि हरमल या किनाऱ्यावर पाणी वाढलेले दिसत होते.
पाणी वाढल्यामुळे शॅक उभारणीचे काम ठप्प झाले आहे. आपले नुकसान होऊ नये यासाठी बहुतेक शॅकवाल्यांनी काल रात्रीच आपले सामान दूर नेल्याने आज शॅकवाल्यांचे फारसे नुकसान झाले नाही.
कोलवा किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांसाठी बांधलेला मनोराही पाण्याखाली गेला होता. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरु नये यासाठी किनाऱ्यावर लाल धोक्याचे झेंडे ठिकठिकाणी लावल्याचे दिसत होते.
मागच्या वर्षी आलेल्या ओखी वादळाने गोव्यातील शॅक मालकांचे कंबरडे मोडले होते. त्या वादळात शॅकवाल्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. हे नुकसान यावेळी भरुन काढण्याच्या इराद्याने गोव्यातील सर्व समुद्र किनाऱ्यावर शॅक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र हे काम चालू असतानाच लुबानचा फटका बसल्याने हे व्यावसायिक पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
