आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
विद्यार्थी-विद्यार्थींना खुलेआम अश्लील चाळे करण्यासाठी पडदे लाऊन सोय करुन देणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत असून पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या दत्तमंदिर येथे नामांकित कॉलेज परिसरातील अनेक कॅफेवर पोलिसांनी (Police) अचानक छापा टाकला. विशेष म्हमजे आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हा छापा टाकत पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे धुळे (Dhule) शहरात एकच खळबळ उडाली असून तरुणाईमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा आहे. कॉलेज परिसरात अशाप्रकारे विद्यार्थी-विद्यार्थींना खुलेआम अश्लील चाळे करण्यासाठी पडदे लाऊन सोय करुन देणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत असून पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भर वस्तीत चालविण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेजची मुले-मुली अश्लील चाळे करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज अचानक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत कॅफेंवर छापा टाकत अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी कॅफे हाऊससंदर्भातील अटी आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. धुळे पोलिसांनी कॅफे हाऊसमधील कॉलेज कपल्सला समजावून सांगितले आणि त्यानंतर त्या सर्वांना त्यांच्या घरी पाठवले. कॅफे हे केवळ चहापान व गप्पागोष्टींसाठी, मनोरंजनाचे ठिकाण आहे. मात्र, कॅफे चालकांकडूनही पडद्याआड तरुण-तरुणींना बसवून अश्लील चाळे करण्याच्या घटनांना मुभा देत प्रोत्साहन दिले जात असल्याने संबंधित कॅफे चालकावरही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, या छापेमारीनंतर पोलिसांनी कॉलेज कपल्सना समाजाची प्रतिष्ठा कायम राखण्यासंदर्भात समजावत आवाहन केलं आहे. तसेच, यापुढेही अशा प्रकारच्या कृतींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या कारवाईनंतर शहरातल चर्चेला उधाण आले असून विद्यार्थ्यांना कॅफेमध्ये वावरताना शिस्त राखण्याचे व नियमावली बनवण्याची मागणी जनतेतून होत आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
