छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Raj Thackeray राज ठाकरेनी छावा सिनेमावरील वाद ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकांसह अनेक मुद्द्यांवर भाषण केलं.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या जाहीर सभांनंतर आज पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण केलं. आपल्या 'राज'कीय शैलीतून विधानसभा निवडणुकांचा निकाल, सध्याचं युती-आघाड्यांचं राजकारण, गाठीभेटी, माध्यमांच्या बातम्या, आरोप-प्रत्यारोप यांसह चौफेर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे काही जुने किस्से सांगताना त्यांच्या भाषणात अभिनयाची नक्कलही पाहायला मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान नांदगावकरांच्या पायाला दुखापत झाली होती, आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय. निकालानंतर प्रतिक्रिया दिली होती पण बोललो नव्हतो. शांत आहे, पण विचार करत नव्हतो असं नाही, मी सगळ्या गोष्टींवर विचार करत होतो, असे म्हणत राज ठाकरेंनी छावा सिनेमावरील वाद ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकांसह अनेक मुद्द्यांवर भाषण केलं. राज ठाकरेंच्या मनसे (MNS) मेळाव्यातील भाषणाच्या 10 प्रमुख मु्द्द्यांचा आढावा या लेखातून घेण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
1. परवा छावा सिनेमाचे दिग्दर्शक आले होते, उत्तम दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं छावा पाहावा. शिवछत्रपती आपली प्रेरणा, संभाजीराजेंचं बलिदान आहे. मी ट्रेलर वगैरे बघितला नव्हता, अमेय खोपकरांनी येऊन सांगितलं. लेझिम हा महाराष्ट्रचा पारंपारिक खेळ आहे, संभाजीराजेंनी कधीतरी हातात लेझिम घेतलीच असेल, इतिहासात नोंद नसावी. हल्ली आपल्याकडे सगळेत इतिहासतज्ज्ञ आहेत. औरंगजेबानं केलेले अत्याचार डोक्यात घेऊन लोक छावा बघायला जायला हवेत, असे म्हणत राज ठाकरेंनी छावा सिनेमावरील वादावरही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
2. निवडणुकांच्या निकालानंतर बरेच लोक मला येऊन भेटले, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी पहिल्यांदाच बघितलं की सन्नाटा पसरलाय. लोकांमध्येच संभ्रम होता, महाराष्ट्रात सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे, असा सवाल राज यांनी विचारला.
1400 लोकांच्या गावात राजू पाटलांना किती मतं असतील?, त्या गावातून राजू पाटलांना एकही मत नाही. अख्ख्या गावातून राजू पाटलांना एक मत नाही पडत?, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.
3. महाराष्ट्रातील निकालावर अनेक निवडून आलेल्यांचाच विश्वास नाही. बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले, 70 ते 80 हजार मताधिक्यानं निवडून यायचे त्यांचा 10 हजार मतांनी पराभव. हे केवळ मीच नाही, अख्खा महाराष्ट्र बोलतोय, निवडून आलेल्या अनेकांचे मला फोन आले आहेत, असेही राज यांनी सांगितले.
4. भाजपला 2014 मध्ये 121, 2019 मध्ये 105 जागा, पण यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांना 42 जागा, कोणाचा विश्वास बसेल का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शरद पवारांना 10 जागा मिळतात, हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. लोकसभेला सर्वाधिक खासदार काँग्रेसचे, पण विधानसभेला काँग्रेसचे केवळ 15 आमदार आले. शरद पवारांचे 8 खासदार, त्यांचे केवळ 10 आमदार आणि अजित पवारांचे 42 आमदार?, केवळ 4 महिन्यांत इतका बदल?'. म्हणजेच लोकांनी आपल्याला मतदान केलंय पण आपल्यापर्यंत आलं नाही. झालेलं मतदान कुठेतरी गायब झालं, असं असेल तर निवडणूक न लढलेलंच बरं, अशा शब्दात निकालावर राज ठाकरेंनी भाष्य केलं.
5. मला एकच सांगायचंय की, जे तुम्हाला पक्षानं सांगितलं ते तुम्ही सतत लोकांपुढे मांडा. आतापर्यंत आपण काय काय केलं, कोणकोणती आंदोलन केली हे लोकांना कळवा. चार प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणे हे बरं नव्हे. हा जाणीवपूर्व केलेला प्रचार असतो, हा जाणीवपूर्व केलेला प्रसार असतो. अनेक पत्रकार अनेक पक्षांच्या दावणीवर बांधले गेले आहेत, अनेक पत्रकार चांगलेही आहेत. भूमिका बदलणं कशाला म्हणतात हे कळतं का?, असे म्हणत राज ठाकरेंनी काही उदाहरणेही दिली.
6. मी थोडं मागे जातो, मी काय सांगतोय ते नीट ऐका. स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली. सन 1975 साली आणीबाणीनंतर 77 साली झालेल्या निवडणुकीनंतर देशभरात इंदिरा गांधींचा पराभव झाला, राजनारायण यांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं. जनता पार्टीत अनेक पक्ष होते त्यात एक जनसंघ होता. जनता पार्टीतील वादांमुळे पुन्हा इंदिरा जिंकल्या आणि मग भारतीय जनता पार्टी उदयास आली. अटलजींनी पक्षाची भूमिका बदलली, गांधीवादी समाजवाद आम्ही पाळू ही भूमिका घेतली, जनसंघ पुलोदमध्ये पवारांसोबत होता. 1978 पासून शिवसेनेनं काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. शिवसेनेन एकही जागा लढवली नव्हती, पण काँग्रेससोबत सेनेची युती होती, असा गौप्यस्फोटच राज ठाकरेंनी केली. राजीव गांधींपुढे पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आपापल्या स्वार्थासाठी प्रत्येकानं भूमिका बदलल्या, मी कधी भूमिका बदलली?. या सर्वांना पत्रकार विचारणार नाहीत का भूमिका बदलली? आजचा दिवस ढकलायचा, काही का बातमी लागेना, असा टोला राज यांनी पत्रकारांना लगावला.
7. कुंभमध्ये किती लोक गेली अजून आकडा येत नाही, असे म्हणत कुंभमेळ्यातील गर्दी आणि चेंगराचेंगरीतील मृतांबाबत राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले.
8. माझ्यामागे ईडी लागली म्हणून माझा मोदींना पाठिंबा अशा गोष्टी पेरल्या गेल्या, जे सांगेन ते शिवरायांची शपथ घेऊन सांगेन. आम्ही आमचा नुकताच व्यवसाय सुरू केला, एके दिवशी पेपरमध्ये बातमी वाचली. बातमी अशी होती की एनटीसीच्या सगळ्या मिल्स काढा आणि कामगारांचे पगार देऊन टाका. एके दिवशी माझ्या सहकाऱ्याचा घाबरत घाबरत फोन आला, ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, असा किस्सा राज ठाकरेंनी ईडीच्या नोटीसंदर्भाने सांगितला.
9. महाराष्ट्राच्या राजकारणाचा एवढा चिखल होऊन बसलाय, भाजपमधला एखादा म्हणतो चहा प्यायला घरी येतो, काय सांगू घरीच पी?' चहा प्यायची गरज काय असं सांगू का मी?, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी लगावला. एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले, माझ्याशी चहा घेतला आणि बाहेर पडले, चंद्रकांत पाटलांनी खुणा केल्या, असे म्हणत राजकीय भेटींवरील चर्चांवरही राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले.
10. आधी राजकारण चांगलं होतं, कोणी कोणाचा वैरी नव्हता. पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरशिवाय मनपा निवडणूक होतच नाही. नगरसेवकांची ओझी कोण उचलेल, अशी भूमिका दिसतेय. सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलेली तारीख आणखी पुढे ढकलतील. जरा सांभाळून राहा, पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत शिस्त पाळायची आहे. फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकाला बोलावू, पदांची नावंही बदलली जातील. मी लहानपणापासून अनेक विजय, अनेक पराभव पाहिले आहेत, पराभवानं खचलो नाही, विजयानं हुरळून गेलो नाही. आज बऱ्याच दिवसांनी तुमची (कार्यकर्त्यांची) भेट झाली. तुम्हीही या लोकांना पुरून उरले पाहिजे, असा सल्ला राज यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
