Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Gadchiroli News : भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात कारवाई करताना महेश नागुलवार यांना वीरमरण आलं होतं.

गडचिरोली : नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत शहीद झालेले सी-60 तुकडीचे जवान महेश नागुलवार यांना अखेरची मानवंदाना देण्यात आली. चार्मोशी तालुक्यातील अनखोडा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. महेश नागुलवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई असा परिवार आहे.
महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती प्राप्त झालेल्या सी-60 कमांडो महेश नागुलवार यांना अर्पण केली.
भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. मात्र, या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे दोन कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलिस अधीक्षकांशी थेट संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचा तळ आमच्या सी-60 च्या बहाद्दर जवानांनी उदध्वस्त केला आहे. मात्र दुर्दैवाने या कारवाईत सी-60 पथकातील पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर… pic.twitter.com/GrR1wD4oEj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 11, 2025
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फुलणार आणि दिरंगी गावाच्या जंगलात नक्षल छावणी उभारण्यात आल्याचे कळाले होते. या गोपनीय माहितीच्या आधारे सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे 18 सी -60 पथक अभियानावर होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सुमारे दिवसभर ही चकमक चालली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने नक्षल तळाचा भंडाफोड केला असून अनेक साहित्य व सामान पथकाने जप्त केले आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

