एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
दिल्लीतील शिंदेंचा सत्कार शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला असून खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवरच टीका केली आहे.

सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे तर शरद पवारांनी देखील एकनाथ शिंदेंचं कौतुक करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सलगी व त्यातच शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची नाराजी, यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत असताना शरद पवारांच्याहस्ते शिंदेंचा झालेला सत्कार आता टीका व कौतुकाचा मुद्दा बनला आहे. शरद पवारांनी केलेल्या सत्कारामुळे शिवसेना ठाकरे गट नाराज झाला असून शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली. आता, संजय राऊतांच्या टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून पलटवार होत आहे.
दिल्लीतील शिंदेंचा सत्कार शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला असून खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवरच टीका केली आहे. त्यानंतर, शिंदे गटाकडूनही राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी राऊतांना एकाच वाक्यात उत्तर दिलं. तू फक्त जळत राहा, एवढच मी बोलेन असं दादा भुसे म्हणाले. तर, आता कोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनीही पलटवार केला आहे. संजय राऊत कुठला तरी तज्ज्ञ आहे. तो माणूस सरकला आहे, दुसरं काही नाही. त्याच्यावर उत्तर नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले.
सत्कार सोहळ्यावर संजय राऊत काय म्हणाले
महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं शिंदेंचा गौरव होणं आणि तेही पवारांच्या हस्ते होणं, या दोन्ही गोष्टी ठाकरेंच्या शिवसेनेला भलत्याच खटकल्या. त्याबद्दलचा ठाकरेंचा संताप राऊतांच्या पत्रकार परिषदेतून बाहेर पडला आहे. ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली अशा लोकांच्या सन्मानासाठी पवारांनी जायला नको होतं, अशा स्पष्ट शब्दात संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. केवळ टीका करुनच संजय राऊत थांबले नाहीत तर दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनालाच त्यांनी दलालांचं संमेलन ठरवून टाकलं. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कोणाचाही सन्मान केला जातोय हा मराठीचा घोर अपमान असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावरुन, आता राज्याच्या राजकारणात या सत्कार सोहळ्यावरुन वार-पलटवार होताना दिसून येत आहेत.
हेही वाचा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

