Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
Beed Police: सुरेश धस यांनी परळी पोलीस ठाण्यातील अधिकारी भास्कर केंद्रे यांच्याकडे 100 टिप्पर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर केंद्रे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधला.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर परळी शहर आणि बीडमधील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांबाबत संशयाचे ढग निर्माण झाले होते. या पोलीस अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याशी हितसंबंध असून या माध्यमातून संबंधित पोलीस कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे आरोप झाले होते. तसेच यापैकी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रचंड आर्थिक माया जमवल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. यापैकी परळी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे (Bhaskar Kendre) यांच्यावरील आरोप सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले होते. भास्कर केंद्रे यांच्या मालकीचे 100 टिप्पर आणि 15 जेसीबी असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर भास्कर केंद्रे यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. भास्कर केंद्रे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळतानाची मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 'एबीपी माझा' या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भास्कर केंद्रे हे गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना ऐकायला मिळत आहे. या क्लिपमध्ये गुणरत्न सदावर्तेंनी भास्कर केंद्रे यांना प्रश्न विचारला की, तुझ्याकडे किती टिप्पर आहेत. त्यावर भास्कर केंद्रे म्हणतात की, टिप्पर सोडा माझ्याकडे किंवा माझ्या नातेवाईकांकडे साधं टायर सापडलं तरी मी पोलीस खात्यातून एका मिनिटात राजीनामा देईन. हे कशामुळे माझ्यावर आरोप करत आहेत, तेच समजत नाही. माझ्याकडे दोन टिप्पर असते आणि यांनी 100 टिप्पर असल्याचा आरोप केला असता तर ठीक होते. मला जेसीबी आणि पोकलेनमधील फरकही कळत नाही. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. तुम्ही परळी शहरात किंवा आमच्या गावाकडे पाठवून कोणाकडेही चौकशी करा. मी आता माझ्या मुलीचं लग्नही कर्ज काढून केलं आहे, असा दावा भास्कर केंद्रे यांनी केला आहे.
सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे यांच्यावर नेमके काय आरोप केले होते?
संतोष देशमुख यांचा मारेकरी असल्याचा आरोप असलेल्या विष्णू चाटे आणि भास्कर केंद्रे याचे संबंध असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. भास्कर केंद्रे हा 15 वर्षापासून परळी पोलीस ठाण्यातच आहे. त्याच्याकडे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर आहेत. यामधून तो राखेची अवैध वाळू वाहतूक करतो. त्याची परळीतील मटका व्यवसायातही भागीदारी असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
सुदर्शन घुलेला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करणार
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोबाईल फोनशी संबंधित पुराव्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीने त्याची पोलीस कोठडी मागून घेतली होती. या कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे एसआयटी त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागते की त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले जाते, हे बघावे लागेल.
आणखी वाचा
बीडच्या पोलिसाकडे 15 जेसीबी, 100 टिप्पर! राख अन् मटका व्यवसायात भागीदारी; सुरेश धसांचे गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
