Raju Patil : डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा 'आका' ठाण्यात बसतोय; मनसेच्या राजू पाटलांचा शिंदे पिता-पुत्रावर वार
Dombivli Illegal Building Case : डोंबिवलीमध्ये 645 इमारतींच्या तोडकामाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पण या सर्व रहिवाशांच्या मागे मनसे उभी असून त्यांना कायदेशीर मदत करणार असल्याचं राजू पाटील म्हणाले.

ठाणे : मराठा आरक्षणाच्या वेळी ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन आश्वासन देण्यात आलं त्याचप्रमाणे आता डोंबिवलीतील 65 इमारतीच्या रहिवाशांना आता फसवण्यात येत आहे असा आरोप माजी आमदार आणि मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला. कल्याण-डोंबिवलीमध्ये या 65 इमारतींव्यतिरिक्त अनेक अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत आणि या अनधिकृत बांधकामांचा आका हा ठाण्यात राहतोय असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. डोंबिवलीतील हजारो नागरिक बेघर होणार असून त्यांच्या लढ्यामध्ये कायदेशीर बाबी लागल्या तर आम्ही त्यांना मदत करू असं आश्वासनही राजू पाटील यांनी दिलं.
डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींच्या पाडकामाचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामध्ये हजारो रहिवासी राहत असून त्यांची बिल्डरने फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. त्यावर या सर्व रहिवाशांच्या पाठीमागे मनसे खंबीर असल्याचं राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत असंही ते म्हणाले.
अनधिकृत बांधकामांचा आका ठाण्यात
या बांधकामांना अधिकारी यंत्रणा ते राजकीय मंडळी जबाबदार आहेत. वॉर्ड ऑफिसर या अनधिकृत बांधकामांना जबाबदार आहेत. पोलिसांनी वॉर्ड ऑफिसारला उलटे केले की सगळी चेन समोर येईल. शिंदेंनी गंगेत डुबकी मारण्यापेक्षा डोंबिवलीला येऊन पुण्य मिळवावं असं राजू पाटील म्हणाले.
एसआयटी स्थापन करून तपास करा
राजू पाटील म्हणाले की, "या प्रकरणावर वेगळी एसआयटी स्थापन करा. कारण इकडून तिकडे गेलेले पोलिस यांचेच बगलबच्चे आहेत. त्यामुळे तेच या प्रकरणाचा तपास करतील याला काही अर्थ नाही. म्हणून म्हणतोय वेगळी एसआयटी स्थापन करा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. ते यामध्ये योग्य न्याय देतील अशी अपेक्षा आहे."
राजू पाटील म्हणाले की, "दिव्यामध्ये एका स्लॅबच्या बांधकामाच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात. दिव्यातील एका आरक्षित जागेच्या बांधकामाबाबत आम्ही तक्रार केली होती. तिथे इमारतीवर कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधण्याची मागणी केली होती. मात्र तसं न होता पुन्हा त्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आलं. पाच नगरसेवक आणि जोशी नावाचा एक अधिकारी त्या ठिकाणी पार्टनर आहेत. अजूनही या बिल्डिंगवर कोणतीही कारवाई नाही. मात्र याच बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या इमारतीला नोटीस आलेली आहे."
राजू पाटील म्हणाले की, "हा दिसतो तेवढा सोपा विषय नाही. मात्र लोक यामध्ये भरडले जातात. बँकेचे एक लिगल डिपार्टमेंट असते. त्यांनी सुद्धा लोन तपासून घ्यायचं असतं. आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत. नागरिकांना मोबदला मिळाला पाहिजे. मात्र यामध्ये बँकेच्या अधिकारी देखील सामील आहेत का? हे तपासावं लागेल."
ही बातमी वाचा:
























