Ajay Boraste on Vinayak Pande : नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले, तिकीट बोरस्तेंना दिलं; विनायक पांडेंच्या खळबळजनक आरोपावर अजय बोरस्ते म्हणाले...
Ajay Boraste on Vinayak Pande : विनायक पांडे यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

Ajay Boraste on Vinayak Pande : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना (Vinayak Pande) उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा गौप्यस्फोट केला. तर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी देखील नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय. आता या आरोपाचे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी विनायक पांडे यांचे आरोप फेटाळले आहेत.
विनायक पांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर खळबळजनक आरोप केला. त्यांनी म्हटलं की, 2014 ची विधानसभा निवडणूक लागली, मी आणि अजय बोरस्ते दोघेही या निवडणुकीसाठी इच्छुक होतो. नीलम गोऱ्हे यांचा भैय्या बहाते कार्यकर्ते होता. त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलायचे का असे सांगितले. तेव्हा मी हो सांगितले. नीलम ताईंना काही रक्कम दिली. त्यानंतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आले. मी त्यांना सांगितले मला पैसे द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलवून पैसे दिले. मात्र, त्यात काही पैसे कमी दिले आहेत, असे त्यांनी म्हटले.
विनायक पांडे यांच्या आरोपात तथ्य नाही : अजय बोरस्ते
आज शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अजय बोरस्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजय बोरस्ते यांना विनायक पांडे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता विनायक पांडे यांच्या आरोपात तथ्य नाही. शिवसेनेत अशा पद्धतीने कधीच पैसे द्यावे लागत नाहीत, असे अजय बोरस्ते यांनी म्हटले. तर, नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता नीलम गोऱ्हे यांचे स्टेटमेंट मी ऐकलेले नाही. त्यामुळे याबाबत बोलणे योग्य नाही. मला कधी असे काही जाणवले नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. इथे पैसे नाही तर काम करणाऱ्या माणसांना संधी मिळते. एकनाथ शिंदेंकडे खऱ्या कार्यकर्त्यांना वाव आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची काय अवस्था आहे हे आपण बघताय. नीलम गोऱ्हे यांच्या बोलण्यात तथ्य असू शकतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
