Sanjay Raut Full PC : निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाईमाणूस; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?
मुंबई: उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षातील पदांचे वाटप करण्यासाठी संबधितांकडून मर्सिडीज गाडी घेतात, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याल नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याविरोधात ठाकरे गट पेटून उठला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्यावर आगपाखड केली. नीलम गोऱ्हे यांना मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलवण्यात आले होते. साहित्यक म्हणून त्यांचे काय योगदान आहे?, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविषयी बोलताना 'नीच', 'नमकहराम', अशा विशेषणांचा वापर केला होता. यावरुन निर्माण झालेल्या वादंगाबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, माझ्यावर एक काय 10 हक्कभंग आणा. नीलम गोऱ्हे महिला असल्या म्हणून काय झालं? मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीविषयी बोलत आहे. त्या उपसभापती म्हणून उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलल्या होत्या का? नीलम गोऱ्हे यांना चारवेळा विधानपरिषदेवर पाठवण्यासारखं त्यांचं काय कर्तृत्व होतं? या विश्वासघातकी बाईला उद्धव ठाकरे यांनी काय कमी केलं? त्यांच्या काही कारणांमुळे त्या शिंदे गटात गेल्या असतील, पण उद्धव ठाकरे यांच्यावर असले आरोप करण्याची काय गरज होती, असे संजय राऊत यांनी म्हटले.























