Beed : बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियानी यांची आत्महत्या, स्वत:वर झाडली गोळी
Beed News : भगीरथ बियानी यांनी आत्महत्या का केली, त्यामागचं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही.

बीड : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेतली. या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. बीड शहराच्या राजकारणातील तरुण चेहरा म्हणून भगीरथ बियाणे यांच्याकडे बघितले जात होते.
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना ही माहिती कळताच त्या तत्काळ रुग्णालयात पोहोचल्या.
भगीरथ बियानी यांनी बीडपासून सुमारे 25 किमी लांब असलेल्या त्यांच्या एमआयडीसी परिसरातील घरामध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या घरी पिस्तुल सापडलं असून त्यामधून गोळी झाडल्याचं स्पष्ट आहे अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली आहे.
भगीरथ बियाणी यांच्या कुटुंबातील सदस्यांना याची सर्वप्रथम माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बियानी यांना रुग्णालयात दाखल केलं. पण त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
बियानी यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही. बियानी यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला असून ते कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. त्यामुळे बियानी यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अंदाज आताच व्यक्त करता येणार नसल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येतंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
