(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
Yash : केजीएफ (KGF) स्टार यश आज पॅन इंडिया स्टार आहे. पॅन इंडिया स्टार होण्यापर्यंतचा यशचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. यशने खिशात फक्त 300 रुपये घेऊन करिअरसाठी घर सोडलं.
Yash : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता यश (Yash) प्रचंड मेहनतीनंतर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. अनेक कलाकारांना जे मिळवता आलं नाही ते यशने स्ट्रगलच्या जोरावर मिळवलं आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर आणि स्टारडममुळे तो देशातील आघाडीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये एक आहे. यश नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. भारतीय सिनेसृष्टीत 'रॉकी भाई','रॉकिंग स्टार' या नावाने यश ओळखला जातो. करिअरच्या सुरुवातीला यशला मोठा संघर्ष करावा लागला आहे. यशने खिशात फक्त 300 रुपये घेऊन करिअरसाठी आपलं घर सोडलं होतं. सर्वसामान्य मुलगा ते रॉकी भाईपर्यंतचा त्याचा प्रवास खरचं उल्लेखनीय आहे.
कर्नाटकमधील हासन या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात यशचा जन्म झाला. त्याचे वडील बस ड्रायव्हर होते. तर आई गृहिणी होती. यशने बालपणीपासूनच अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. स्वप्न साकार करण्यासाठी यश अभ्यासदेखील सोडायला तयार होता. पुढे आई-वडिलांच्या सांगण्यानुसार त्याने शिक्षण पूर्ण केलं.
आई-वडिलांनी ठेवलेली 'ही' अट
यशने सिनेसृष्टीत पाऊल ठेवावं असं त्याच्या आई-वडिलांना कधीच वाटत नव्हतं. यशने सरकारी नोकरी करावी अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण मुलाच्या इच्छेपुढे आई-वडिलांचं काही चाललं नाही. यशला वयाच्या 16 व्या वर्षी त्याच्या आई-वडिलांनी सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी होकार दिला. त्यावेळी यशने बंगळुरुमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला. तसेच स्वत:ला जर सिनेसृष्टीत सिद्ध करता आलं नाही तर पुन्हा मनोरंजनसृष्टीत पाऊल न ठेवण्याची अट त्याच्या आई-वडिलांनी घातली होती.
यश ज्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी बंगळुरुमध्ये आला होता ते प्रोजेक्ट दोन दिवसांनी रद्द करण्यात आलं. त्यावेळी रॉकी भाईच्या खिशात फक्त 300 रुपये होते. यशने हिंमत ठेवली. हार मानली नाही आणि बंगळुरुमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कामाच्या शोधात असताना त्यांची भेट नाटककार बी.वी कारंत यांच्यासोबत झाली आणि त्यांच्या नाटकाच्या टीममध्ये तो सामील झाला. नाटकासाठी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून तो काम करू लागला. बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून रंगभूमीवर वावरणारा यश पुढे त्याच नाटकात मुख्य भूमिकेत काम करू लागला. नाटकानंतर यशने टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. उत्तरायण या मालिकेत त्याने काम केलं.
यशचा KGF पर्यंतचा प्रवास
यश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता होता. पुढे चित्रपटांसाठी त्याला अनेक ऑफर्स मिळू लागल्या. यशने 2007 मध्ये 'जंबाडा हुडुगी' या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारत कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तसेच मनसु, मोडाललासाला, लकी, गुगलीसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. यश पुढे 'रॉकिंग स्टार' झाला.
यशने 2018 मध्ये 'केजीएफ चॅप्टर 1 या चित्रपटाच्या माध्यमातून कन्नड सिनेसृष्टीचा चेहरा बदलला. 'केजीएफ' (KGF) या चित्रपटाच्या माध्यमातून यश पॅन इंडिया स्टार झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.
यशचे आगामी चित्रपट कोणते? (Yash Upcoming Movies)
यशकडे अनेक शानदार प्रोजेक्ट आहेत. गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी यश सज्ज आहे. तसेच नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटात तो रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवीसोबत (Sai Pallavi) झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रामायण चित्रपटात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या