MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू, राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Pune Crime : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शन पवार हिचा संशयस्पद मृत्यू झालाय.

Pune Crime : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शन पवार हिचा संशयस्पद मृत्यू झालाय. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळालाय. पुण्यात सत्कार स्वीकारायला गेल्यानंतर दर्शना बेपत्ता होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांच्या जबाबात सांगितलेय. दर्शनासोबत तिचा मित्रही बेपत्ता असल्याचे समजतेय.
स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून (एमपीएससी) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) पोस्ट काढलेल्या 26 वर्षीय तरुणीचा राजगड किल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. काही दिवस पुण्यात देखील तिने क्लास केले होते. त्यानंतर ती गावी जावून सेल्फ स्टडी करत होती. तिने नुकतेच स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते.
दरम्यान, पुण्यातील एका अॅकडमीच्या वतीने तिचा सत्कार समारंभ होता. 9 तारखेला त्यानिमित्ताने ती पुण्यात आली होती. तिच्या नर्हे येथील एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी ती मैत्रिणीला सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते. तसेच, कुटूंबाला देखील तिने याबाबत कल्पाना दिली होती. तिच्या एका मित्रासोबत ती गेली होती. 12 जून दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटूंबाने शोध घेतला. पण, ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटूंबाने सिंहगड रोड पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती. सिंहगड पोलिसांनी लागलीच तरुणीचा व त्या तरुणाचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान दर्शनासोबत गेलेला तरूण देखील बेपत्ता असल्याबाबत समोर आले. त्याच्या कुटूंबाने याबाबत वारजे माळवाडी पोलिसांत मिसिंग दाखल केली. त्यानंतर या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला. 12 जूनच्या दुपारनंतर या दोघांचे मोबाईल बंद झाले होते. शेवटचे लोकेशन वेल्हा येथील आल्याने त्यानूसार पोलिसांकडून शोध सुरू होता.
आज राजगड किल्ऱ्याच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वेल्हा पोलिसांनी लागलीच धाव घेत तपास सुरू केला. तिचा मोबाईल इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटूंबाने धाव घेऊन तिची ओळख पटवली. यादरम्यान, प्राण्यांनी मृतदेहाशी छेडछाड केलेली असल्याचेही समोर आले. तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र देखील बेपत्ता असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नेमक घडले काय, याबाबत पोलीस आता युद्धपातळीवर तपास करत आहेत. सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
