(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Infosys Share: इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण; गुंतवणुकदारांना 40 हजार कोटींचा फटका
Infosys Share Crash: चौथ्या तिमाही निकालानंतर इन्फोसिसच्या शेअर दरात मोठी घसरण झाली. इन्फोसिसच्या गुंतवणुकदारांचे 40 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Infosys Share Crash: माहिती-तंत्रज्ञान (Information and Technology) क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये आज मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. इन्फोसिसचा शेअर जवळपास 7 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मागील दोन वर्षातील ही मोठी घसरण असल्याचे म्हटले जात आहे. इन्फोसिच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणी मागे कंपनीचा तिमाही निकाल प्रामुख्याने कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आजच्या घसरणीमुळे इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांचे सुमारे 40 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
चार दिवसांच्या सु्ट्टीनंतर शेअर बाजार पुन्हा सुरू झाला तेव्हा विक्रीचा सपाटा सुरू असल्याचे दिसून आले. इन्फोसिसचा तिमाही निकाल 13 एप्रिल रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात आला. निकाल फारसा उत्साहवर्धक नसल्याची चर्चा होती. त्यानंतर आज शेअर दरात घसरण दिसून आली. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कंपनी सोडून जात असल्याचे समोर आल्याने बाजार निराश असल्याचे म्हटले जात आहे.
बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा, इन्फोसिसचा शेअर सकाळी 1605 रुपयांवर खुला झाला. त्यानंतर सात टक्क्यांनी घसरून हा शेअर 1590 रुपयांवर आला. सकाळी 10.53 वाजता इन्फोसिसच्या शेअरची किंमत 7.27 टक्क्यांच्या घसरणीसह 1621.25 रुपये इतकी झाली होती.
इन्फोसिसने मागील आठवड्यात तिमाही निकाल घोषित केला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांची वाढ होऊन 5686 कोटी रुपये इतका झाला. तर, 2020-21 या आर्थिक वर्षात 5076 कोटी इतका नफा होता. तर, इन्फोसिस कंपनीचा महसूल या दरम्यान 22.7 टक्क्यांनी वाढून 32,276 कोटी रुपये इतका झाला. कंपनीने शेअरधारकांना 16 रुपये प्रति शेअर इतका डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे. याआधी कंपनीने 15 रुपयांचा अंतरीम डिव्हीडंड दिला आहे. याचाच अर्थ कंपनीने 2021-22 या वर्षात 31 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड दिला आहे.
आगामी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल 13 ते 15 टक्के दराने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इन्फोसिसने सांगितले की, वर्ष 2021-22 मध्ये चौथ्या तिमाहीच्या दरम्यान कंपनीला 2.3 अब्ज डॉलरचे कंत्राट मिळवण्यास यश मिळाले आहे. तर, पूर्ण वर्षात कंपनीने 9.5 अब्ज डॉलरचे कंत्राट मिळवले आहे.
(ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करणाऱ्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.Com कडून गुंतवणुकीबाबत सल्ला दिला जात नाही)