कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
Chitra Wagh on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली आहे.

Chitra Wagh on Aaditya Thackeray : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दिल्ली दौऱ्यावर गेले. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची दिल्लीत भेट घेतली. आता यावरून भाजपच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलंय की, ज्यांच्या आजोबांना नेते 'मातोश्री'वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय..! मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का? संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात. पण, आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का? आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत. महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा? आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय.
ज्यांच्या आजोबांना नेते 'मातोश्री'वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय..! मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 13, 2025
संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक…
आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
दरम्यान, दिल्लीत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले, याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, कोणी कोणाचे कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. संजय राऊत यांनी काल यावर उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्याबरोबरच नाहीत. त्यांनी महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली आहे. अनेक लोक पक्ष फोडतात, पण राग या गोष्टीचा आहे की, एकनाथ शिंदे यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे पाप केले. त्यांनी दिलेले नाव, चिन्ह चोरण्याचे पाप केले, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
