INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पंतप्रधानपदी मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात 26 टक्क्यांचे अंतर आहे. मोदी यांना 51.02 टक्के लोकांनी पसंती दिली, तर राहुल यांना 24.9 टक्के लोकांनी पसंती दिली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालातही भाजपला विजय मिळाला. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळही गाठू न देणाऱ्या इंडिया आघाडीत राज्यातील धोरणांवरून तसेच जागांवरून कमालीचे मतभेद ताणले गेले आहेत. त्यामुळे आघाडी राहते की नाही? असा सवाल केला जात आहे. त्यामुळे देशात आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय निकाल लागतील? याबाबत इंडिया टूडेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार आता देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप सहज सरकार स्थापन करू शकेल. भाजपला 281 जागांसह स्पष्ट बहुमत मिळू शकते. तर काँग्रेसला केवळ 78 जागा जिंकता येतील असा अंदाज आहे.
इंडिया आघाडी कायम राहिली पाहिजे का?
या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, विरोधी पक्षांची इंडिया आघाडी अजूनही कायम राहायची का? याला उत्तर देताना सुमारे 65 टक्के लोकांनी इंडिया आघाडी राहिली पाहिजे असे म्हटले आहे. 25.6 लोक होते ज्यांचा असा विश्वास होता की विरोधकांनी इंडिया आघाडी संपवली पाहिजे. त्यामुळे इंडिया आघाडीत मतभेद संपवून एकीने लढा दिल्यास निश्चित भाजपसाठी आव्हान आहे. पंतप्रधानपदी मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात 26 टक्क्यांचे अंतर आहे. मोदी यांना 51.02 टक्के लोकांनी पसंती दिली, तर राहुल यांना 24.9 टक्के लोकांनी पसंती दिली.
पीएम मोदींच्या कामावर किती लोक खूश आहेत?
पंतप्रधानांच्या कामावर तुम्ही किती खूश आहात? जेव्हा लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 36.1 टक्के लोकांनी 'खूप चांगली', 25.7 टक्के लोकांनी 'चांगली', 15.8 टक्के लोकांनी 'सरासरी', 8.3 टक्के लोकांनी 'वाईट' आणि 12.8 टक्के लोकांनी 'खूप वाईट' म्हटले. म्हणजेच 60 टक्क्यांहून अधिक लोक असे मानतात की पीएम मोदींनी चांगले किंवा खूप चांगले काम केले आहे आणि ते त्यांच्या कामावर खूश आहेत.
भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकते
इंडिया टुडे आणि सीव्होटर्सच्या सर्वेक्षणानुसार आता देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल. भाजप 281 जागा जिंकू शकतो. तर एनडीए आघाडीला 343 जागांचे भक्कम बहुमत मिळेल. इंडिया आघाडीला 188 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणात देशभरातील लोकसभेच्या 543 जागांवर 54 हजारांहून अधिक लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
