एक्स्प्लोर
Advertisement
खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर
खान्देशातील जळगाव शहर आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग तसेच धुळे शहरात सध्या डेंग्यूने कहर माजवला आहे. जळगाव जिल्ह्यात १०० वर, शहरात ३०० वर आणि धुळे शहरात १०० वर डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. जळगावात एका महिलेसह ३ जणांचा तर धुळ्यात दोन महिलांचा डेंग्यूमुळे बळी गेला आहे. असे असले तरी दोन्ही महानगर पालिकांचे प्रशासन, पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांनी या जीवघेण्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
जळगाव व धुळ्यात खासगी रुग्णालयात उपचार करुन घेणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण किमान २ हजारांवर जातात. जळगाव शहराची लोकसंख्या ५ लाखांवर आणि धुळे शहराची लोकसंख्या साडे पाच लाखांवर आहे. दोन्ही ठिकाणी ड वर्ग महानगर पालिका असून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. जळगाव शहरात जवळपास ३ वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छता बंद असून व्यापारी संकुले, चौक आणि सार्वजनिक जागा, खुले भूखंड हे तुंबलेल्या घाणींचे आगार झाले आहेत. असाच प्रश्न धुळ्यातही असून तेथेही सार्वजनिक साफ सफाई हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
घाणीमुळे आणि तुंबलेले पाणी किंवा साठवलेल्या पाण्यात डासांचा मोठा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण तयार झाले आहे. अनेक दिवसांचा कचरा कुजून, त्यात डबकी साचून डेंग्यू, ताप, हिवताप व मुदतीच्या तापाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहे. जळगाव आणि धुळे शहरातील हे चित्र समान आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली. याच काळात महानगर पालिकेकडून साफ सफाईकडे दुर्लक्ष झाले. काही भागात दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी आल्या. देवपुरातील वाडिभोकर रोडलगत असलेल्या अनमोल नगर आणि त्या लगतच्या कॉलन्यांमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या वाढली. त्यात काही रुग्णांत डेंग्यूची लक्षणे आढळली. तपासणीअंती २० पेक्षा अधिक जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यातील एका महिला रुग्णाचा नंतर मृत्यू झाला. मार्केट यार्ड परिसरातही काही रुग्ण आढळले. डेंग्यूचा हा कहर वाढत असताना महानगर पालिकेचा सफाई व आरौग्य विभाग ढीम्म आहे. धुळे शहरात किटकनाशक फवारणी किंवा धूर फवारणी बंद आहे. वातावरण प्रदूषित असताना अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. गल्ली क्रमांक पाचमधील मच्छिबाजार परिसरातील नागरिकांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दूषित पाणी नेऊन दाखविले.
जळगाव शहरात धुळ्यापेक्षा भयंकर स्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. या आजारामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यू निर्मूलनाचा देखावा करीत ३७ तपासणी पथकांनी घरांची तपासणी केली. त्यात शहरात डेंग्यूचे २६७ रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. मात्र, खासगी दवाखाने व रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजारावर असल्याचा अंदाज आहे. शहरातील स्वच्छतेच्या कामांचे ठेके प्रभाग निहाय दिलेले आहेत. मात्र, साफ सफाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत.
धुळ्यात डेंग्यूचे थैमान सुरु असल्याचे लक्षात घेवून व महानगर पालिकेचा नाकर्तेपणा पाहून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मनपा आयुक्त श्रीमती संगीता धायगुडे यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधून स्वच्छतेविषयी सूचना केल्या.
मनपाच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक घेवून उपाय योजना करा, असेही डॉ. भामरे म्हणाले. दरम्यान, धुळ्यातील डेंग्यूच्या थैमानाकडे प्रस्थापित नेते आमदार अमरिश पटेल व आमदार अनिल गोटे यांनी दूर्लक्ष केले आहे. या विषयावर त्यांनी महानगर पालिका प्रशासनाला जाब विचारलेला नाही. महापौर जयश्री आहिरराव व इतर पदाधिकारी प्रशासनाच्या आडमुठेपणासमोर हतबल आहेत. विविध प्रकारच्या आरोपांमुळे धुळे महानगर पालिका बरखास्तीची चर्चा अधुनमधून सुरु असते.
जळगाव शहराची अवस्था अत्यंत वाईट प्रकारातली आहे. महानगर पालिकेत माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. महापौर नितीन लढ्ढा हे आघाडीचे तर उपमहापौर ललित कोल्हे मनसेचे आहेत. महानगर पालिकेची आर्थिक स्थिती दिवाळखोर प्रकारातील आहे. शहराचे आमदार सुरेश भोळे भाजपचे आहेत. त्यांना पक्षांतर्गत किंमत नाही. भाजपचे १५ नगरसेवकांपैकी बहुतांश आमदार भोळेंना नेता मानत नाही. जळगाव भाजपची विभागणी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात झाली आहे. मंत्री महाजन यांचे भाजपपेक्षा खान्देश विकास आघाडीशी चांगले सख्य आहे. पण, ते उघडपणे जळगाव शहरासाठी काहीही करु शकत नाही. दुसरे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव शहराशी फारसा संबंध नाही. जिल्हा पालकमंत्री पांडुंरग फुंडकर आहेत. त्यांची अवस्था, आपण यांना पाहिले का ? अशी आहे. अशा स्थितीत जळगावकर भगवान भरोसे आहेत. जळगाव, धुळ्यातील डेंग्यू अजून काय कहर माजवतो ? हेच पाहणे आपल्या हातात आहे.
‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :
- खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल
- खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!
- खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र
- खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?
- खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट
- खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा
- खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी
- खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement