IND vs SL 3rd T20: राजकोटमध्ये रंगणार तिसरा टी20 सामना, कसा आहे टीम इंडियाचा येथील रेकॉर्ड
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात राजकोटमध्ये तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मालिकेतील अखेरचा सामना असून दोघांनी एक-एक सामना जिंकल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे
India vs Sri lanka, 3rd T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या टी-20 मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. आता या मालिकेतील निर्णायक सामना शनिवारी अर्थात 7 जानेवारी रोजी राजकोटमध्ये होणार आहे. इथला आतापर्यंतचा भारताचा रेकॉर्ड पाहिला तर तो भारतासाठी चांगलाच ठरला आहे. टीम इंडियाने येथे चार पैकी तीन टी-20 सामने जिंकले आहेत.
भारताने आतापर्यंत राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर चार आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. यादरम्यान तीन सामने जिंकले. एका सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. टीम इंडियाने आपला पहिला T20 सामना ऑक्टोबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. यानंतर दुसरा सामना नोव्हेंबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. टीम इंडियाने 2019 आणि 2022 मध्ये सामने जिंकले होते. त्याने बांगलादेशचा 8 विकेट्सने तर दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाचा सामना राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेचा संघ प्रथमच या मैदानावर सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा सामना निर्णायक ठरणार आहे.
रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावा
रोहित शर्माने राजकोटमध्ये भारतासाठी सर्वाधिक टी-20 धावा केल्या आहेत. त्याने येथे तीन आंतरराष्ट्रीय सामन्यात 98 धावा केल्या आहेत. या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने 2 सामन्यात 94 धावा केल्या आहेत. रोहित आणि कोहलीने येथे प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले आहे. युवराज सिंग 77 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर महेंद्रसिंग धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. धोनीने 73 धावा केल्या आहेत. आता उद्याच्या सामन्यात हे तिघेही संघात नसून नेमका कोणता फलंदाज कमाल करतो हे पाहावे लागेल.
मालिकेत दोन्ही संघ बरोबरीत
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर झाला. रोमहर्षक सामन्यात भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. पण दुसऱ्या सामन्यात पुण्याच्या एमसीएस मैदानात श्रीलंकेचा संघ 16 धावांनी जिंकला. ज्यामुळे दोन्ही संघानी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
हे देखील वाचा-