(Source: Poll of Polls)
Pankaja Munde: "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो"... पंकजा मुंडे कळवळल्या Beed Lok Sabha Result 2024
बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा (Beed Lok Sabha Result 2024) मतदारसंघातील पराभवामुळे सध्या जिल्ह्यात तणावग्रस्त वातावरण आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव हा त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या नैराश्यातूनच गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या तीन कट्टर समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी गुरुवारी एक व्हीडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना धीर देण्यासोबतच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे. पंकजा मुंडे यांच्या या आवाहनानंतर तरी आता त्यांचे समर्थक नैराश्य झटकून नव्या उमेदीने उभे राहणार का, हे पाहावे लागेल.
बीडमधील चिंचेवाडी येथे 36 वर्षीय तरुणाने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पोपट वायभासे असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. यापूर्वी ऊसतोड कामगार पांडुरंग रामभाऊ सोनवणे यांनी आत्महत्या केली होती. तर पंकजा मुंडे समर्थक सचिन मुंडे याचाही अपघाती मृत्यू झाला होता. या सगळ्यामुळे सध्या बीड जिल्हा आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.