Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धस आणि सतीश भोसले यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Suresh Dhas & Satish Bhosale : भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाई याने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर त्याचे नवनवीन कारनामे उघड होताना दिसत आहेत. तर सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे अनेक फोटो व्हायरल सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून आपण सतीश भोसलेला ओळखतो, अशी कबुली सुरेश धस यांनी दिली आहे. आता सुरेश धस आणि सतीश भोसले यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ऐ खोक्या, माझा तुला 100 टक्के आशीर्वाद
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सुरेश धस म्हणतात की, ऐ खोक्या, हॅलो....अरे सॉरी हा बाबा.... मला गडबडीत शुभेच्छा द्यायला जमल नाही. यानंतर सतीश भोसले म्हणतो बोला ना... सुरेश धस पुढे म्हणतात काय नाही काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा.... यावर सतीश भोसले म्हणतो, धन्यवाद भाऊ... तुमचा आशीर्वाद राहुद्या फक्त पाठिशी. यावर सुरेश धस म्हणतात, 100 टक्के आहे... 100 टक्के... 99 सुद्धा नाही, असे दोघांमधील संभाषण आता व्हायरल झाले आहे. आता या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे. सतीश भोसलेला सुरेश धस यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना सतीश भोसलेने मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने तो चर्चेत आला आहे. पोलिसांनी सतीश भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे.
आणखी वाचा























