मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मनोज जरांगे यांनी प्रेस घेतल्यानंतर मी आज प्रेस घेतोय. एका धनगर तरुणाला जालना येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पुणे : जालन्यात चटके देऊन एका तरुणाचा अमानुष छळ केल्या प्रकरणातील आरोपी उबाठा तालुका अध्यक्ष नवनाथ दौडचां मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचे विधिमंडळ अधिवेशनातही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. एका धनगर तरुणाला मंदिरात का गेला म्हणून आरोपीने अमानुष पद्धतीने लोखंडी सळईने चटके देत मारहाण केल्याची चर्चा सोशल मीडियात आणि परिसरात होत आहे. या घटनेवरुन तीव्र संताप होत असतानाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये, एक व्यक्ती नंदी बैलाच्या मूर्तीची विटंबना करताना दिसून येतो. तसेच, या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, ही व्यक्ती तीच आहे, ज्यास चटके देऊन मारहाण करण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता, मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच जरांगे यांनी दाखवलेल्या व्हिडिओवरही ते बोलले.
मनोज जरांगे यांनी प्रेस घेतल्यानंतर मी आज प्रेस घेतोय. एका धनगर तरुणाला जालना येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांना भेटलो, जरांगे पाटील या ना त्या कारणावरून राज्यात दोन जातीत भांडण लावण्याचे काम करत आहेत, असे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. बोराडे याला न्याय मिळालं पाहिजे अशी मागणी आहे. जरांगे यांनी बोराडेचा दारू प्यायल्याचा व्हिडीओ दाखवला, पण तो महादेव भक्त आहे. जवळ मंदिर आहे, महाशिवरात्रीला तो तिकडे गेला होता. मात्र, त्या माणसाने समाज विघातक कृत्य केलेलं नाही, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी बोराडेच्या दारू पिण्याचं समर्थन केलंय. अर्धवट कपड्यात गेला असा आरोप जरांगे करत आहेत. पण, अश्लील हावभाव केलं म्हणून मारणार का? पोलिस यंत्रणा आहे ना. मंदिरातील पुजारी आणि कुंभमेळामधील साधू काय पूर्ण कपड्यात असतात का? असा सवाल हाके यांनी विचारला आहे.
... तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध रस्त्यावर उतरू
मनोज जरांगे याच्या अजेंड्यावर ओबीसी नेतेच असतात, मी असतो. रोहित पवार याची आयटी सेल जरांगे यांना पाठिंबा देत आहे. त्यामुळे, जरांगे यांची गृहखात्यामार्फत चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. मुखमंत्र्यापासून सगळे नेते राजकारण करत आहेत का? आम्हाला न्याय देत नाहीत. कैलास बोराडे यांना न्याय मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देणार असतील मुख्यमंत्री तर आम्ही त्याच्या विरोधातही रस्त्यावर उतरू, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
काय म्हणाले जरांगे पाटील
जरांगे पाटील यांनी एक देवदेवतांच्या विटंबनेचा व्हिडिओ दाखवत मागणी केली आहे. परळीत आमच्या जातीच्या माणसाला दुसऱ्या जातीच्या लोकांनी मारहाण केली आहे. आम्ही जातीचं वळण दिलं नाही. तुम्ही आमचे काढा आम्ही तुमचे व्हिडिओ काढणार आहोत. भुजबळ जन्मल्यापासून मराठा आरक्षणासाठी आडवे येतात. सगळ्या जातीचं आरक्षण घेतात. कोणत्याही प्रकरणाला जातीचा रंग देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना विनंती आहे की, देव देवतांची विटंबना करणाऱ्याला शोधा आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या























