Rohit Pawar: 'मी आमदार म्हणून माझ्यावर जबाबदारी; पक्षाचा पदाधिकारी म्हणून...', नाराजीच्या चर्चा अन् पोस्टवर रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Rohit Pawar: माझ्यावर आमदार म्हणून मोठी जबाबदारी आहे. पण पार्टीचा पदाधिकारी म्हणून माझ्याकडे कोणतीही जबाबदारी नाही असं म्हणत रोहित पवारांनी नाराजी आणि पोस्टबाबत स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपुर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती, ज्यानंतर रोहित पवार हे शरदचंद्र पवार पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा राज्यभरात रंगली होती. छावा चित्रपटाच्या संबंधित एक पोस्ट रोहित पवारांनी शेअर केली होती. यानंतर आमदार रोहित पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, असे रोहित पवार यांनी लिहिले होते, त्यावरीत आज रोहित पवारांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाराजीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, मी फार भावनिक आहे. मी आक्रमक आहे, पण भावनिक देखील आहे. एकाद्या गोष्टीवर मला असं वाटलं की एखाद्या गोष्टीवर पार्टीने पक्षाच्या नेत्यांनी स्टॅंड घ्यायला हवा तो घेतला नसेल तर मी फार भावनिक होतो, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आज जे महाराष्ट्रात चाललेलं आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये सरकार आल्यापासून सगळं इतकं चांगलं बहुमत असून सरकार इतक्या चुका करत आहे. त्या चुकांचा परिणाम हा सामान्य लोकांना सहन करावा लागतो आहे. आम्ही पक्ष म्हणून किंवा विरोधक म्हणून ज्या आक्रमक पध्दतीने मुद्दे मांडायला हवेत ते कोणीच मांडत नाही. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की, कधीतरी महाराष्ट्र नाराज असेल आणि आम्ही एखादी ठोस भूमिका घेत नसेल तर मलाही वाटतं एक पार्टी म्हणून किंवा त्याचा एक घटक म्हणून मी देखील नाराज आहे असा तो त्यामध्ये हेतू होता, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
पक्षात मिळणाऱ्या जबाबदारीवरती काय म्हणाले रोहित पवार?
एकतर पक्षाने मला तिकीट दिलं, आमदारकीची संधी दिली. प्रचाराला सर्व नेते आले. माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या मतांनी आणि आशिर्वादाने मी आमदार झालो आहे. त्यामुळे माझ्यावर आमदार म्हणून मोठी जबाबदारी आहे. पण पार्टीचा पदाधिकारी म्हणून माझ्याकडे कोणतीही जबाबदारी नाही. आमदार म्हणून आणि या देशाचा नागरिक म्हणून जे मला योग्य वाटतं ते मी बोलत असतो. पक्षाकडून जबाबदारी मिळणे अपेक्षित आहे का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, त्याची एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पक्षातील जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे हे पाहतात. पक्षात जबाबदारी मिळण्याबाबत तुम्ही इच्छा व्यक्त केली नाही का यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, प्रत्येकाचा स्वभाव वेगळावेगळा असतो. काही जण इच्छा व्यक्त करतात, काही जण करत नाहीत. मी व्यक्त न करणाऱ्यांपैकी आहे. काम करणाऱ्यांपैकी आहे. आज तुम्ही कोणतीही कंपनी घ्या, अधिकारी घ्या, राजकारण घ्या, जो करतो तोच टीकतो. फक्त बोलत राहिला आणि काहीच केलं नाही तर तो टिकू शकत नाही. मला माझ्यावर विश्वास आहे, मी एका विचाराने चाललो आहे. मी त्यासाठी कष्ट करतो. मी जे बोलतो ते करतो, आणि इच्छा व्यक्त करणं. मला हे पद द्या हे करणं माझ्या स्वभावात नाही, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
राज्याचं राजकारण चुकीच्या पध्दतीने सुरू
राज्यात सुरू असलेलं सध्याचं राजकारण हे चुकीच्या पध्दतीने सुरू आहे. अनेक मुद्दे मागे पडत चाललेले आहे. शिक्षण, रोजगार अशा प्रश्नांकडे लतक्ष दिले पाहिजे असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

