Rohit Pawar: विधानसभेत निवडणुकीत महायुतीला यश का मिळालं अन् महाविकास आघाडीचा पराभव का झाला? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Rohit Pawar: विधानसभेला महाविकास आघाडी कुठे कमी पडली आणि महायुतीने कसं यश मिळवलं याबाबत रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरती देखील भाष्य केलं आहे.

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात यश मिळालं मात्र त्यानंतर असं काय घडलं की, विधानसभेत सर्व चित्र पालटलं त्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. रोहित पवारांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात त्यांच्या झालेल्या मुलाखतीमध्ये विधानसभेला महाविकास आघाडी कुठे कमी पडली आणि महायुतीने कसं यश मिळवलं याबाबत उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरती देखील भाष्य केलं आहे.
रोहित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आमचं मत होतं, आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे. लोकांशी चर्चा केली पाहिजे. लोकांना काय हवं काय देता येईल याचं आफण एक व्हिजन डॉक्युमेंट त्यांना दिलं पाहिजे. पण आमच्यातले बरेच लोक किती तिकीटे, किती नंबर कोणला काय दिलं पाहिजे याच्यात जरा गुंतले. काही प्रमाणात बोलायला गेलं तर आम्ही हवेत गेलो. आता काही ठरावीक लोक सोडले तर, शरद पवार हे नेहमी जमिनीवर राहणारे आहेत. शरद पवार हे जमिनीवर राहिले आणि लढले. बाकी जी मिळून एक धोरण बनवलं गेलं पाहिजे होतं, मुद्दे पाहिजे होते, लोकसभेला काही मुद्दे ठरले होते, सोयाबीनचा मुद्दा, कपाशीचा मुद्दा, बेरोजगारीचा मुद्दा, संविधानाचा मुद्दा, त्यानंतर विधानसभेला आमच्यातील काही नेते हवेत गेले आणि नेते हवेत गेल्यानंतर एक काहीतरी वेगळंच बोलतो आहे, कोण काहीतरी वेगळंच बोलतो आहे. त्याउलट महायुतीने एकत्रित काम केलं. त्यांनी निवडणुकीमध्ये गाजरं दाखवली, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
निवडणुकीमध्येच त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यांनी तीन महिन्यांचे अॅडव्हान्स पैसे दिले. आता सत्तेत आल्यानंतर मात्र, म्हणतात आम्ही विचार करू ते धोरण करून पुढे गेले. खोटं बोलले पण, रेटून बोलले. लोकांना दुर्दैवाने सगळं खरं वाटलं. गुडांचा वापर केला, पैशांचा वापर केला, आणि या सर्व धोरणांमुळे त्यांना यश मिळालं आणि दुर्दैवाने आम्हाला ते मिळू शकलं नाही. यामध्ये काही प्रमाणात आमच्या देखील चुका आहेत. काही प्रमाणात त्यांनी धोरण केलं त्यामुळे त्यांच्याकडे पैसे, सत्ता जास्त प्रमाणात आलं. महायुतीला लोकसभेला यश आलं नाही, विधानसभेला आलं पण पुढे येईलच असं नाही असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
पक्षात मिळणाऱ्या जबाबदारीवरती काय म्हणाले रोहित पवार?
एकतर पक्षाने मला तिकीट दिलं, आमदारकीची संधी दिली. प्रचाराला सर्व नेते आले. माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या मतांनी आणि आशिर्वादाने मी आमदार झालो आहे. त्यामुळे माझ्यावर आमदार म्हणून मोठी जबाबदारी आहे. पण पार्टीचा पदाधिकारी म्हणून माझ्याकडे कोणतीही जबाबदारी नाही. आमदार म्हणून आणि या देशाचा नागरिक म्हणून जे मला योग्य वाटतं ते मी बोलत असतो. पक्षाकडून जबाबदारी मिळणे अपेक्षित आहे का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, त्याची एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पक्षातील जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे हे पाहतात. पक्षात जबाबदारी मिळण्याबाबत तुम्ही इच्छा व्यक्त केली नाही का यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, प्रत्येकाचा स्वभाव वेगळावेगळा असतो. काही जण इच्छा व्यक्त करतात, काही जण करत नाहीत. मी व्यक्त न करणाऱ्यांपैकी आहे. काम करणाऱ्यांपैकी आहे. आज तुम्ही कोणतीही कंपनी घ्या, अधिकारी घ्या, राजकारण घ्या, जो करतो तोच टीकतो. फक्त बोलत राहिला आणि काहीच केलं नाही तर तो टिकू शकत नाही. मला माझ्यावर विश्वास आहे, मी एका विचाराने चाललो आहे. मी त्यासाठी कष्ट करतो. मी जे बोलतो ते करतो, आणि इच्छा व्यक्त करणं. मला हे पद द्या हे करणं माझ्या स्वभावात नाही, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
राज्याचं राजकारण चुकीच्या पध्दतीने सुरू
राज्यात सुरू असलेलं सध्याचं राजकारण हे चुकीच्या पध्दतीने सुरू आहे. अनेक मुद्दे मागे पडत चाललेले आहे. शिक्षण, रोजगार अशा प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. सरकारकडे बहुमत असलं तरी तीन पक्ष आहे. सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री बोलत होते आणि मुख्यमंत्र्यांकडे हातवारे करत होते. ते बोलत असताना विधान परिषदेत नोटींग केले जाते त्यात ते रजिस्टर होते. हे एक प्रकारचं राजकारण आहे. बाहेर वेगळ्या प्रकारचे राजकारण केले जाते. आता कदाचित एका मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले जाते. यातून आमदाराने, नेत्यांना संदेश जातोय की तुमच्याच नेत्याचा मी ऐकत नाही. जर काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे या. मी तुमचं काम करतो. पहिल्या बजेटमध्ये सरकारबाबत लोक नकरात्मक झाले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडले
रोहित पवार पुढे म्हणाले की, एखाद्या मुद्द्यावर वेगळ्या दिशेने लोकांचं लक्ष न्यायचं असेल तर औरंगजेबचा मुद्दा आणण्यात आला, तो फ्लॉप झाला. लोक आता ते स्वीकारायला तयार नाहीत. त्यांची मेन बॉडी आरएसएसने सुद्धा भाजपला वाऱ्यावर सोडले आहे. मग आता दुसरा मुद्दा कोणता आणायचा तर दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित केला. माझं असं मत आहे की, लोकांच्या हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला आज अडचणीत आहेत. त्यांच्याबद्दल आज बोलले जात नाही, चर्चा केली जात नाही. कशावर चर्चा केली जाते तर एक थडगं? तो विषय आज संबंधित नाही, असे त्यांनी म्हटले.
सरकारला सुद्धा जमिनीवर आणावं लागेल
मला कधी कधी वाटते की, आम्ही चुकतो. सत्ताधारी आम्हाला त्यांच्या पिचवर आणायला बघतात आणि आम्ही त्यांच्या पिचवर जातो. त्यांनी औरंगजेबचा मुद्दा काढला आणि आम्ही त्याला काउंटर करत बसलो. आम्ही सुद्धा काही प्रमाणात रणनीती बदलली पाहिजे आणि कुठेतरी सरकारला सुद्धा जमिनीवर आणावं लागेल की मुद्द्याचा बोला. आज मुद्द्याचा बोललो नाही तर महाराष्ट्र असाच मागे जात राहील. आम्ही जेव्हा गुजरात बद्दल बोलतो, तेव्हा सत्ताधारी म्हणतात तुम्ही गुजरातची पब्लिसिटी करत आहात. गुजरात गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या फार पुढे गेला आहे आणि आपण फार मागे राहिलेलो आहोत. गुजरातची लोकसंख्या सात कोटी आहे. आपली लोकसंख्या 12 कोटी आहे. मात्र आपलं उत्पन्न घटत चालले आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

