येर लॅपिड इस्रायलचे नवे पंतप्रधान; भारतावर काय परिणाम होणार?
Yair Lapid New PM of Israel : इस्रायलमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर येर लॅपिड यांना नवे पंतप्रधान बनवण्यात आलं आहे. लॅपिड नफ्ताली हे बेनेट सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते.
Yair Lapid New PM of Israel : नफ्ताली बेनेट यांच्यानंतर येर लॅपिड (Yair Lapid) हे इस्रायलचे 14वे पंतप्रधान बनले आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी बेनेट यांच्या आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले लॅपिड यांना अंतरिम अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. बेनेट आणि लॅपिड यांनी वेगवेगळ्या विचारसरणीच्या आठ पक्षांसह युतीचे सरकार स्थापन केलं होतं. ते फार काळ टिकणार नाही, असं सुरुवातीपासूनच सरकारबद्दल बोललं जात होतं. अखेर तसंच झालं आणि हे सरकार कोसळलं. दरम्यान, सोशल मीडियावर राज्यातील महाविकास आघाडी आणि इस्त्राइलमधील सरकारची तुलना केली जात होती. तसेच, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर इस्त्राइलमधील सरकारही कोसळणार असल्याचं बोललं जात होतं.
आता नफ्ताली बेनेट यांच्या जागी लॅपिड यांना काही महिन्यांसाठी काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आलं आहे. बेनेटसह युतीचं सरकार पडल्याची घोषणा करताना, लॅपिड म्हणाले, "आम्ही पुढील काही महिन्यांत निवडणूक लढवणार आहोत. परंतु, आपल्या देशापुढील आव्हानं त्यांची वाट पाहू शकत नाहीत."
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री आणि सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे लॅपिड हे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर देशाचे काळजीवाहू पंतप्रधान झाले. हे पद भूषवणारे ते 14 वे व्यक्ती आहेत. मावळते पंतप्रधान नफ्ताली बेनेट हे इस्रायलच्या इतिहासातील सर्वात लहान पंतप्रधान आहेत. त्यांचे सरकार स्थापन होऊन अवघ्या वर्षभरातच पडले.
इस्रायलमध्ये आता 1 नोव्हेंबर रोजी नवीन निवडणुका होणार आहेत. 2019 ते 2022 मधील ही पाचवी निवडणूक असेल. नफताली बेनेट सरकारमध्ये क्रमांक दोनवर असलेल्या येर लॅपिड यांना काळजीवाहू सरकारची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) पाठिंबा गोळा करून पुन्हा पंतप्रधान होऊ शकतात, असं मानलं जात होतं. मात्र, नंतर नव्यानं निवडणुका घेणं योग्य ठरेल, असा निर्धारही त्यांनी घेतला आहे.
इस्रायलच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ 12 वर्षे पंतप्रधान असलेले बेंजामिन नेतन्याहू यांची हकालपट्टी करून बेनेट यांचं सरकार स्थापन झालं. त्यासाठी वेगवेगळ्या विचारसरणीचे 8 पक्ष एकत्र आले. संसद बरखास्त करण्याच्या ठरावाला 92 सदस्यांनी पाठिंबा दिला, तर कोणीही विरोध केला नाही.
लॅपिड यांचं भारताबद्दलचं मत
पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, लॅपिड यांनी परराष्ट्र मंत्री असताना अर्थमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या आहेत. भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक चांगले व्हावेत, यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करताना दिसले. जून 2021 मध्ये जेव्हा ते बेनेटसोबत सत्तेत आले, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, इस्रायलचे नवीन सरकार भारतासोबत धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी काम करेल.
यानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये, जेव्हा एस जयशंकर इस्रायलच्या दौऱ्यावर होते, तेव्हा लॅपिड यांनी त्यांना मित्र म्हणून संबोधले होते. लॅपिड यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आणि इस्रायलला भेट दिल्याबद्दल जयशंकर यांचे आभार मानले होते.
भारतीय पंतप्रधान इस्रायलच्या दौऱ्यावर असताना लॅपिड यांनी भारत-इस्रायल द्विपक्षीय संबंधांवर भर दिला. आता ते स्वत: अल्प काळासाठी इस्रायलचे पंतप्रधान असल्यानं ते इस्रायलचे भारतासोबतचे संबंध कसे पुढे नेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.