Shrigonda Assembly Election : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात नेमकं कोणते 'पाचपुते' रिंगणात? कुटुंबात देखील इच्छुकांची गर्दी
Shrigonda Assembly Election : भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, असं बोललं जात आहे.
Shrigonda Assembly Election : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे तब्येतीच्या कारणाने येऊ घातलेली विधानसभा निवडणुक लढवणार की नाही? असा संभ्रम आहे. बबनराव पाचपुते यांच्याच कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे पाहुयात हा रिपोर्ट.
सध्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघातच भाजपचे आमदार आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मोनिका राजळे आणि श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते बबनराव पाचपुते हे निवडणूक रिंगणात असणार का? अशी चर्चा रंगू लागलीये. त्याचे कारण आहे बबनराव पाचपुते यांची बिघडलेली प्रकृती आहे. प्रकृतीच्या कारणाने मागच्या अनेक दिवसांपासून बबनराव पाचपुते हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत होते. त्यामुळे बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्याच कुटुंबातील इतर सदस्य निडणूक लढवणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं बबनराव पाचपुते यांनी म्हटलं आहे.
बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते किंवा त्यांची पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते निवडणूक लढवणार अशा देखील चर्चा रंगत आहेत. मात्र याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं दोघांकडूनही सांगितले जात आहे.
दरम्यान एकीकडे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत स्पष्टता नसताना दुसरीकडे मविआतील सर्वच घटक पक्षातील नेते उमेदवारी करण्याची तयारी करत आहेत. त्यात काँग्रेसचे घनश्याम शेलार, शिवसेना ठाकरे गटाचे साजन पाचपुते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल जगताप यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलीये. तर बेलवंडी गावचे अण्णासाहेब शेलार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांनी देखील निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलीये.
विरोधकांसोबतच भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वपक्षातून होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. भाजपच्याच पदाधिकारी असलेल्या सुवर्णा पाचपुते यांनी देखील आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे.
बबनराव पाचपुते हे भाजपमध्ये येण्याआधीपासूनच भाजपमध्ये काम करत असलेल्या सुवर्णा पाचपुते यांनी केवळ निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी फक्त इच्छाच व्यक्त केलेली नाही तर बबनराव पाचपुते यांच्यावर जुन्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना गृहीतच धरत नसल्याचा आरोप केलाय. सोबतच पक्ष श्रेष्ठी निष्ठावंतांना संधी देणार का? हे देखील मला पाहायचे आहे, असं म्हंटलंय. कीकडे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने इच्छुकांची मांदियाळी,आणि त्यातून होणारा विरोध, त्यातच स्वपक्षातूनही होणारा विरोध, यावर बबनराव पाचपुते कसे मात करतात? आणि पक्षश्रेष्ठी नेमकी उमेदवारी कुणाला देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी