Nashik Crime CCTV : नाशिकमध्ये युवकाला मारण्यासाठी सिनेस्टाइल पाठलाग, पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंडाची दहशत
Nashik Crime CCTV : गरबा (Garba) खेळण्याच्या वादातून टोळक्याने एका तरुणाचा पाठलाग करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime CCTV : गरबा (Garba) खेळण्याच्या वादातून टोळक्याने एका तरुणाचा पाठलाग करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेळीच युवकाने एका घरात जाऊन लपून बसल्याने पुढील अनर्थ टळला. पुन्हा एकदा नाशिक (Nashik) शहरात टोळक्यांचा धुडगूस माजविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचे सुरक्षितेवर टांगती तलवार आहे.
सध्या सगळीकडे नवरात्रीचा (Navratri 2022) उत्साह असून रात्रीच्या सुमारास गरबा दांडियाने बहर आला आहे. शिवाय पावसाने देखील उघडीप अवघ शहर दांडियासाठी गर्दी करत आहेत. मात्र असे असताना शहरातील धुडगूस घालणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. शहरातील सिडको परिसरात गरबा खेळण्याच्या वादातून टोळक्याने युवकाला मारण्यासाठी थेट हातात धारदार शस्त्र घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. वेळीच युवकाने एका घरात घुसून आश्रय घेतल्याने त्याचा जीव वाचला. विशेष म्हणजे घटना घडूनही अंबड पोलिसांनी कारवाई न केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको परिसरातील राजरत्ननगर परिसरात दांडिया खेळण्याच्या दोन जणांमध्ये वाद झाला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारीत रुपातंर झाले. मात्र यावेळी संशयित युवकाने हातात धारदार शस्र असलेली टोळी जमवून युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी संबंधित युवकाणे तिथून पळ काढला. युवकाला मारहाण करायला 25 ते 30 जणांची टोळी हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करत होते. गुंडाच्या टोळीने पाठलाग केल्याने युवक राजरत्नगर येथे एका घरात जाऊन लपून बसला. त्या घराबाहेर शस्त्रधारी गुंड उभे राहिले. या घरातील व्यक्तीने हिंमत करून गुंडांना परत पाठवल्याने मोठा अनर्थ टळला. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे
जेलरोड परिसरात मुलीला मारहाण
जेलरोडच्या एका मंडळासमोर दांडिया खेळण्यासाठी आलेल्या परराज्यातील अल्पवयीन मुलीचा हात विरघळून तिच्या मानेवर डोक्यावर नागरिकांसमोर परिसरातील टवाळखोर तरुणांनी ठोसे लगावत मारहाण केल्याचा प्रकार काल सायंकाळी उघडकीस आला आहे. मुलगी बेशुद्ध होताच आणि नागरिक जागरूक होताच ओळख मित्रासह पसार झाला. पोलिसांना कळूनही त्यांनी दखल न घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी देखील शहरातील मध्यवर्ती भागात गुंडाच्या टोळीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. 20 ते 25 जणांची टोळी हातात धारदार शस्र घेऊन घरांवर दगडफेक करत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी देखील पोलिसांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. दरम्यान नाशिक शहरात अशा प्रकारच्या टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे या घटनांवरून दिसून येते. विशेष म्हणजे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंडाची दहशत सुरु आहे.
पोलिसांनी कठोर पाऊले उचलायला हवी
नाशिक शहरात वाहनांची जाळपोळ, खून, टवाळखोरांचा खुलेआम धुडगूस, महिलांचे दागिने खेचून नेणे इत्यादी असंख्य घटनांची मालिका अव्याहतपणे सुरू असल्याने नाशिक शहराची वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेने सुरु असल्याचे घटनांवरून दिसून येते आहे. गुन्ह्यांच्या घटनांत वाढ होतंच असून रोज कुठे ना कुठे हाणामारी, अत्याचार, लूटमार आदी घटना उघडकीस येत आहेत. शहरातील गुन्ह्यांच्या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत ठोस भूमिका घेणे महत्वाचे आहे.