कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नागपुरात पुन्हा एकदा निर्बंध? पालकमंत्री नितीन राऊतांचे संकेत
गेले दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येतच वाढ होताना दिसत आहे. आज नागपुरात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कालही 10 रुग्ण आढळले होते.
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचे सूतोवाच दिले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर नागपूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर पुन्हा निर्बंध लावण्याखेरीज उपाय नसल्याचे म्हटलं आहे.
पहिल्या टप्प्यात बाजाराची वेळ कमी केली जाईल. त्यासाठी दुकानं उघडण्याची वेळ संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कमी केली जाईल. तर हॉटेल रात्री 8 वाजेपर्यंतच सुरु राहतील. शनिवारी आणि रविवारी बाजार पूर्णपणे बंद ठेवले जाईल असे नितीन राऊत म्हणाले. मात्र हे निर्बंध अमलात आणण्यापूर्वी व्यापारी, उद्योजक, नागरिक, संघटना या सर्वांशी चर्चा केली जाईल. तीन ते चार दिवसानंतर हे निर्बंध अमलात आणले जातील असं नितीन राऊत म्हणाले.
विशेष म्हणजे गेले महिनाभर नागपुरात कोरोना कोरोनाबाधितांची दैनिक संख्या एक अंकी होती. मात्र, गेले दोन दिवस त्यात वाढ होताना दिसत आहे. आज नागपुरात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कालही 10 रुग्ण आढळले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा अनुभव आणि कोरोना बाधितांच्या संख्येत वाढीचे संकेत प्रशासनाला पुन्हा निर्बंध लावण्यासाठी मजबूर करत असल्याचे नितीन राऊत म्हणाले.
नागपुरात काही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला असून आतापर्यंत 78 बाधितांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. येत्या दोन ते तीन दिवस चर्चा केल्यानंतर हे निर्बंध अमलात येतील अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.
नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख
नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. आज 6 सप्टेंबर रोजी नागपुरात एकूण12 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 12 पैकी 7 रुग्ण शहर, एक रुग्ण ग्रामीण आणि चार रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. तर आज तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या नागपुरात 55 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. नागपुरात 1 सप्टेंबर रोजी 6 रुग्ण, 2 सप्टेंबर रोजी 6 रुग्ण, 3 सप्टेंबर रोजी 1 रुग्ण, 4 सप्टेंबर रोजी 7 रुग्ण, 5 सप्टेंबर रोजी 10 रुग्ण तर आज 12 रुग्ण आढळले आहेत.