Beed Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांची नेमणूक करा, मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक
Beed Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांची नेमणूक करा, मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज धनंजय देशमुख यांच्यासह मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी. आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. (Beed) याप्रकरणी केज पोलिसांनी सुरुवातीला केलेला तपास असमाधानकारक असल्याचं धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाला सांगितलं. अन्नत्याग आंदोलनापूर्वी झालेल्या पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत अनपेक्षित बाब उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. केज पोलीस एसपींच्या कानावर तपास काय झाला हे घालत नसल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. पोलिसांनी आरोपींना अभय दिल्याचा आरोप ही धनंजय देशमुख यांनी केला. (Dhananjay Deshmukh)
न्यायासाठी ग्रामस्थांचा एल्गार
हत्येच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थ हे आंदोलन करत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पहिल्या दिवशीच मस्साजोगच्या नागरिकांनी दोन दिवस रस्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उतरले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. नंतर वाल्मीक कराड वर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी ही मस्साजोगच्या नागरिकांची होती .यासाठी धनंजय देशमुख यांनीही मोठं आंदोलन केलं .आंदोलनाच्या उद्रेकानंतर वाल्मीक कराड वर गुन्हा दाखल करण्यात आला . आता तिसऱ्यांदा धनंजय देशमुख आणि ग्रामस्थ आंदोलनाला बसलेत .न्यायासाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे .अन्नत्याग आंदोलनात सर्व आरोपींना अटक करून कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे























