Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
Prajakta Mali : महाशिवरात्री निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीचा शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलाय.

Prajakta Mali : महाशिवरात्री (Maha Shivratri 2025) निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) यांचा शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलाय. या विरोधात माजी विश्वस्त ललिता शिंदे चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र दिले आहे. यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही. चुकीचा पायंडा पाडू नये, अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली आहे. मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आता माजी विश्वस्तांच्या विरोधानंतर प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माजी विश्वस्त ललिता शिंदे म्हणाल्या की, उद्या महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे. जगभरातून लाखो भक्त त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणार आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने येथे दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमामध्ये सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोणत्याही सेलिब्रिटींचा आजपर्यंत कार्यक्रम झालेला नाही. ट्रस्टींनी परंपरांचा गांभीर्यपूर्वक विचार करून कार्यक्रम ठेवले पाहिजे.
चुकीचा पायंडा पाडू नये
हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही. महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे. इथे धार्मिकच कार्यक्रम झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी येथे शिवस्तुती करणार असेल, तरीदेखील त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य, कथक नृत्य ठेवले पाहिजे. पण, सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने सुरु केला आहे. ते अत्यंत चुकीचे घडत आहे. त्यात बदल करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये
ललिता शिंदे पुढे म्हणाल्या की, प्राजक्ता माळी येथे आल्यानंतर लाखो लोक त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दाखल होतील. माझी एसपी साहेबांना विनंती आहे की, येथे जर काही अनुचित प्रकार घडला तर याची संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहणार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे दोन दरवाजे बंद ठेवले जातात. त्या दिवशी जर गर्दी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? याचा खुलासा करावा. मी याबाबत देवस्थानला पत्र देणार आहे. एएसआयने देखील यावर लक्ष घालावे. प्राजक्ता माळी या स्त्रीला माझ्या विरोध नाही. पण, अशा सेलिब्रेटी आणून पवित्र शिवरात्रीच्या दिवशी अनुचित प्रकार घडला तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट याची जबाबदारी उचलणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. देवस्थान ट्रस्टने नवीन परंपरा सुरू केली आहे. ती अत्यंत चुकीची आहे. त्यामध्ये ताबडतोब बदल झाला पाहिजे. कुठलाही पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने सुरू करू नये, अशी माझी विनंती आहे. माझ्या मागणीचा आपण विचार करावा अशी, विनंती देखील ललिता शिंदे यांनी केली आहे.
आणखी वाचा























