MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
एपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून क्लास 2 च्या पोस्टसाठी उमेदवारांच्या निवडी झाल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा (MPSC) परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या असून अशा एकूण 498 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या आहेत. शासन निर्णय आज जारी झाला असून मिळालेल्या सर्व उमेदवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अभिनंदन केलं आहे. एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून या उमेदवारांची निवड झाली होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नियुक्त्या अडकून पडल्य होत्या. अखेर, आज या 498 उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश पारीत झाल्याने वेटींगवर असलेल्या भावी अधिकाऱ्यांना पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच संबंधित निवड झालेले उमेदवार आपला पदभार स्वीकारतील, त्यामुळे पात्र निवड झालेल्या उमेदवारांना आनंद झाला आहे. एपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून क्लास 2 च्या पोस्टसाठी उमेदवारांच्या निवडी झाल्या आहेत. त्यामध्ये, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींचा समावेश आहे. या पदांवर हे 498 उमेदवार लवकरच पदभार स्वीकारुन शासनाच्या सेवेत कार्यरत होतील.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 ऑक्टोबर 2024 च्या पत्रान्वये राज्यसेवा परीक्षा-2022 च्या अंतिम निकालानुसार गट-अ संवर्गात एकूण 244 उमेदवारांची शिफारस केली आहे. सदर 244 उमेदवार तसेच राज्यसेवा परीक्षा-2021 च्या निकालान्वये मुदतवाढ घेतलेला 1 उमेदवार अशा एकूण 245 उमेदवारांची कागदपत्र तपासणी दिनांक 9 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये यशदा, पुणे या प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर कागदपत्र तपासणीस 239 उमेदवार उपस्थित होते व 6 उमेदवार अनुपस्थित होते. कागदपत्र तपासणीस उपस्थित 239 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने प्रशिक्षणास रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे 238 उमेदवारांचे अहवाल तपासून देण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार 238 उमेदवारांपैकी 229 उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, NCL प्रमाणपत्र पडताळणी, EWS, सत्यता पडताळणी, क्रिडा प्रमाणपत्र पडताळणी, अनाथ प्रमाणपत्र पडताळणी इ. बाबींचा अहवाल संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाला आहे. उर्वरित 9उमेदवारांचे अहवाल संबंधित यंत्रणांकडून अप्राप्त आहेत, असे शासकीय आदेशात म्हटलं आहे.
2 एप्रिल रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होणार
प्राप्त अहवाल विचारात घेऊन खालील 229 उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील रकाना क्रमांक 4 येथे नमूद पदावर दिनांक 2 एप्रिल 2025 पासून एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत सीपीटीपी-10 या तुकडीअंतर्गत दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी या आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या आहेत. अशा एकूण 498 नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 21, 2025
यात उपजिल्हाधिकारी,… pic.twitter.com/fmdyMMhT0H
2022 च्या निकालानुसार 269 उमेदवारांना नियुक्ती
महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा-2022 च्या अंतिम निकालानुसार गट-ब संवर्गात एकूण 370 उमेदवारांची शिफारस केली आहे. सदर 370 उमेदवार तसेच राज्यसेवा परीक्षा-2021 च्या निकालान्वये मुदतवाढ घेतलेले 10 उमेदवार तसेच शहीदांचे पाल्य 2 अशा एकूण 382 उमेदवारांची कागदपत्र तपासणी वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर कागदपत्र तपासणीस 332 उमेदवार उपस्थित होते व 50 उमेदवार अनुपस्थित होते. सदर उपस्थित 332 उमेदवारांचे अहवाल तपासून देण्यासाठी संबंधीत यंत्रणांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार 332 उमेदवारांपैकी 269 उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, NCL प्रमाणपत्र पडताळणी, EWS, सत्यता पडताळणी, क्रिडा प्रमाणपत्र पडताळणी अनाथ प्रमाणपत्र पडताळणी इ. बाबींचा अहवाल संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाला आहे. उर्वरित 63 उमेदवारांचे अहवाल संबंधित यंत्रणांकडून अप्राप्त आहेत. प्राप्त अहवाल विचारात घेऊन खालील 269 उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील रकाना क्रमांक 4 येथे नमूद पदावर 02 एप्रिल 2025 पासून एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत सीपीटीपी-10 या तुकडीअंतर्गत दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी या आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे. सदर परिविक्षाधीन अधिकारी यांनी दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता वनामती प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे प्रशिक्षणासाठी रुजू व्हावे, असे शासन आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
