पीएनबी घोटाळा प्रकरण : बँकेच्या माजी एमडी उषा अनंतसुब्रमण्यम यांना जामीन मंजूर
नीरव मोदीकडून होत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांविषयी अनंतसुब्रमण्यम यांना कल्पना असतानाही त्यांनी आरबीआयची दिशाभूल केली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

मुंबई : पीएनबी बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील बँकेच्या माजी कार्यकारी संचालक उषा अनंतसुब्रमण्यम यांना सोमवारी मुंबईतील सीबीआय कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. उषा यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठीची परवानगी दिली असल्याची माहिती सीबीआयनं सोमवारी कोर्टात दिली आहे. केंद्र सरकारनं 13 ऑगस्ट रोजी त्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहितीही सीबीआय कोर्टाला देण्यात आली.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय लोकसेवेत असलेल्या व्यक्तीवर खटला चालवता येत नसल्यानं याप्रकरणात राष्ट्रपतींची परवानगीही घेण्यात आली आहे. त्यानुसार उषा अनंतसुब्रमण्यम यांच्याविरोधात खटला चालवण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार सुब्रमणियन या सीबीआय कोर्टासमोर हजर झाल्या होत्या.
पीएनबी घोटाळ्यात अनंतसुब्रमण्यम यांचे नाव आल्यानंतर अलाहाबाद बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते. मात्र त्यांना बँकेच्या सेवेतून काढून टाकण्यात आलं नव्हतं. अनंतसुब्रमण्यम ऑगस्ट 2015 आणि मे 2017 यावेळी पीएनबी बँकेच्या प्रमुखपदी होत्या.
नीरव मोदीकडून होत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांविषयी सुब्रमणियन यांना कल्पना असतानाही त्यांनी आरबीआयची दिशाभूल केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
