Mumbai News : पोलीस पेट्रोलिंगसाठी आणलेल्या 300-400 मोटरसायकल तीन ते चार महिन्यांपासून धूळखात
मुंबईत पोलीस पेट्रोलिंगसाठी आणलेल्या गाड्या तीन ते चार महिन्यांपासून धूळखात उभ्या आहेत. या मोटरसायकलचं वाटप कधी होणार आणि पेट्रोलिंगसाठी रस्त्यावर कधी वापरल्या जाणार हे प्रश्न उपस्थित होत आहेत
मुंबई : मुंबईत पोलीस पेट्रोलिंगसाठी आणलेल्या गाड्या तीन ते चार महिन्यांपासून धूळखात असल्याचं समोर आहे. जवळपास 300 ते 400 मोटरसायकल मुंबईतील भोईवाडा नायगाव इथल्या मैदानात उभ्या आहेत. या गाड्याचं वाटप कधी होणार, पेट्रोलिंगसाठी रस्त्यावर कधी वापरल्या जाणाऱ्या हे प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय या गाड्या मैदानात अशाच धूळखात असल्याने जनतेच्या पैशांचाही अपव्यय होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केलं आहे.
भोईवाडा नायगाव इथलं पोलीस हुतात्मा मैदान जे हॉकी मैदान म्हणून ओळखलं जातं तिथे गेल्या तीन ते चार महिन्यापासून अंदाजे 300 ते 400 मोटरसायकल धूळखात उभ्या आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की या मोटरसायकलचे पार्ट चोरीला जात आहेत. तर या संदर्भात एबीपी माझाने स्थानिक भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस केली असता आमच्याकडे चोरीची कुठलीही तक्रार आलेली नाही अशी माहिती मिळाली.
विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी या मोटरसायकलवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसही तैनात केले आहेत, जे या मोटरसायकलवर 24 तास लक्ष ठेवतील.
लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यातच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धूळखात असलेल्या या दुचाकी येणाऱ्या पावसात भिजून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोटरसायकल खरंच रस्त्यावर पेट्रोलिंगसाठी वापरल्या जाणार आहेत की त्या स्क्रॅपला जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस विभागातील खेळाडूंसाठी हुतात्मा मैदान ही एक चांगली आणि खुली जागा आहे. इथे रोज वेगवेगळ्या खेळांचा सराव केला जातो. मात्र पार्क केलेल्या दुचाकींमुळे निम्मी जागा व्यापली आहे. परिणामी इथे दररोज सराव करणार्या खेळाडूंना जागेची अडचण निर्माण होते.
खरंतर सामान्य जनतेला एक मोटरसायकल घ्यायला एक लाख रुपये मोजावे लागतात. पण या मैदानात लाखो रुपयांच्या मोटरसायकल धूळखात उभ्या आहेत. यातून करदात्यांच्या पैशांचा गैरवापर कशाप्रकारे होत आहे, याचं उत्तम उदाहरण दिसून येत आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मात्र याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केल्याचं दिसतं.
इतर बातम्या