ABP Majha Exclusive : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच, अनागोंदी कारभाराचा 'एबीपी माझा'कडून पर्दाफाश
ABP Majha Exclusive : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. मंत्रालयातील या अनागोंदी कारभाराचा एबीपी माझाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

मुंबई : राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो. सर्वसामान्यांची तपासीणी केल्याशिवाय, पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांचा ढिग कैद झाला आहे. एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असूनही मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्या कशा? मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस या दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरी या दारूच्या बाटल्या आल्या कुठून आणि ही दारु रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? याची माहिती कोणालाच नाही.
मंत्रालयातील अनागोंदी कारभाराचा एबीपी माझाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. कारण मंत्रालय कुठलं मॉल सेंटर नाही किंवा कुठलीही खाऊ गल्ली नाही. तर ते राज्याच मुख्यालय आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. याच मंत्रालयात सर्वसामान्य जनता आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्या आयुष्यातील गंभीर प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयात येत असतात. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. दत्तात्रय भरणे याबाबत बोलताना म्हणाले की, "ही अत्यंत गंभीर बातमी आहे. याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल." पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
