Prakash Ambedkar : योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
Prakash Ambedkar : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Prakash Ambedkar : पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतले आहे. तर बलात्काराच्या प्रकरणावर गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केलाय. योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात योगेश कदम यांनी जे संवेदनशील वक्तव्य केलं ते दुर्दैवी आहे. कुठल्याही घटनेवर सामान्य माणूस शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मंत्रिपदावर बसलेले मंत्री असे वक्तव्य करतात त्यातून पोलीस खात्याला मिळतो आणि आरोपीलाही बळ मिळते. असंवेदनशील मंत्री योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावे? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पुणे घटनेवरून पोलिसांवर ओढले ताशेरे
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी श्वान पथकाची गरज लागते. शंभर पोलिसांची गरज लागते. अनेक अधिकारी त्यांना लागले अशी परिस्थिती आहे. यावरून एकच स्पष्ट होत आहे की, पोलीस खाते कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या ऐवजी अजून काय काय करते? याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले.
संजय राऊतांची योगेश कदमांवर टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का? गृह राज्यमंत्री दिव्य आहेत. शांतपणे बलात्कार पार पडला त्यामुळे बाहेर ज्यांना समजलं नाही, त्यांचं म्हणणं आहे तीने स्ट्रगल केले नाही. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्या पुण्यातच का या सगळ्या गोष्टी घडत आहेत? ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली. याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला.
आणखी वाचा
























