एक्स्प्लोर
कोस्टल रोडविरोधात कोळी बांधवांची हायकोर्टात धाव, सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर भर टाकून जमीन तयार केली जाणार आहे. ज्यामुळे मुंबईचे मुळ निवासी असलेल्या कोळी समाजाचं अस्तित्त्वच धोक्यात येईल अशी भितीही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात बोलून दाखवली.
![कोस्टल रोडविरोधात कोळी बांधवांची हायकोर्टात धाव, सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब Koli society run high court against coastal road, hearing adjourned till Wednesday कोस्टल रोडविरोधात कोळी बांधवांची हायकोर्टात धाव, सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/13215910/coastal-road.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वरळी कोळीवाडा नाखवानं राज्य सरकारच्या प्रस्तावित कोस्टल रोडला विरोध करत हायकोर्टात धाव घेतली आहे. अंदाजे 29 किलोमीटर लांबीच्या या सागरी मार्गाच्या बांधकामामुळे मरिन लाईन्स ते कांदिवलीपर्यंतच्या पट्ट्यातील तमाम कोळी बांधवांच्या जीवनावर विपरीत परिणाम होणार आहे.
हा प्रकल्प संमत करताना कोळी समाजाला डावललं गेलं, त्यांच मत विचारात घेतली नाहीत. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणाशी संबंधित अनेक परवानग्या प्रलंबित आहेत. असे आरोप या याचिकेतून करण्यात आले आहेत. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर भर टाकून जमीन तयार केली जाणार आहे. ज्यामुळे मुंबईचे मुळ निवासी असलेल्या कोळी समाजाचं अस्तित्त्वच धोक्यात येईल अशी भितीही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात बोलून दाखवली. या संदर्भात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए) कडून उत्तर येणं अपेक्षित असल्यानं हायकोर्टानं बुधवारपर्यंत ही सुनावणी तहकूब केली.
मुंबईकरांना हवाहवासा वाटणारा कोस्टल रोड कोळी बांधवांना नकोसा
मुंबईकरांचं समुद्रावरुन जलदगती प्रवासाचं आणखी एक स्वप्न म्हणजे कोस्टल रोड लवकरच साकार होणार आहे. शिवसेनेच्या या महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्टमुळे येत्या काही वर्षातच नरिमन पाँईंट ते थेट कांदीवलीपर्यंतचा प्रवास आता सागरी किनारी रस्त्यानं म्हणजेच कोस्टल रोडनं होईल. मात्र, मुंबईकरांच्या या सुसाट प्रवासासाठी बरीच मोठी किंमत मोजावी लागणार आहे. समुद्रात भराव टाकून तयार केला जाणारा कोस्टल रोड हा समुद्रावरच ज्यांचं पोट अवलंबून आहे, अशा कोळी समाजाला मात्र तो नकोसा आहे. इतर मुंबईकरांचा प्रवास सुसाट झाला तरी वर्षानुवर्ष मासेमारी करणारा कोळी बांधव या मुंबईतून कोस्टल रोडमुळे कायमचा हद्दपार होण्याची भीती आहे. सध्या कोस्टलरोडसाठी पूर्वतयारीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, शिवसेनेच्या या ड्रीम प्रोजेक्टला शिवसेनेचाच पारंपारिक मतदार कडाडून विरोध करत आहे.
कोस्टल रोड कसा आहे?
प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत एकूण 35.6 किमी लांबीचा कोस्टल रोड असणार आहे.
समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून तसेच पूल आणि बोगदा असे गुंतागुंतीचे हे बांधकाम असणार आहे.
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी 5303.34 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
एकूण प्रकल्पाचा खर्च विविध करांमुळे तब्बल 12 हजार 721 कोटींवर पोहचला आहे.
कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरापर्यंतचा प्रवास सुस्साट होणार आहे.
हा प्रकल्प झाल्यास दरवर्षी 34 टक्के अर्थात 350 टन इंधनाची बचत होणार आहे.
या मार्गावरच पावणेतीन मीटर रुंदीची बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल. तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल.
हा मार्ग पॉट होल फ्री व्हावा अर्थात खड्डे पडू नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत 9.98 किलोमीटर लांबीच्या या कोस्टल रोडचे काम महापालिकेमार्फत होणार आहे. सध्या हाच टप्पा वादात सापडला आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सि-लींकचा कोस्टल रोडचा टप्पा हा समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी अनंत अडचणी घेऊन येणारा आहे. कारण याच टप्प्यात आधीच वांद्रे-वरळी सी-लिंक उभा आहे आणि आता याच ठिकाणी आणखी कोस्टल रोडचे पिलर उभे राहतील. त्यामुळे समुद्रात होड्यांची ये-जा करणं कठीण होईल. वादळ-वाऱ्यात, भरतीच्या वेळी पिलरचे अडथळे संकट ठरणार आहेत.
कोस्टल रोडच्या कामासाठी समुद्रात भराव टाकले तर अर्थातच माशांच्या अनेक जाती नष्ट होतील. समुद्रातली जैवविविधता नष्ट होणारच पण कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येईल. वरळी कोळीवाड्यातली जवळपास 1000 कुटुंबांची उपजीविका वरळी कोळीवाड्यातल्या 450 बोटींच्या जीवावर आहे.100-150 वर्षे पिढ्यांनपिढ्या ही लोकं पारंपारिक व्यवसायाला धरुन आहेत
कोळी समाजाच्या मागण्या काय आहेत?
- कोस्टल रोडच्या मार्गातून नौकांची ये-जा करण्यासाठी दोन पिलरमधील अंतर कमीत कमी 200 मीटर असावं.
- समुद्रातील मासेमारीची पारंपारिक जागा मासेमारीसाठीच राखीव ठेवावी.
- माऊंटमेरी ते बाणगंगेपर्यंत गेली अनेक वर्ष कोळी समाजाच्या पारंपारिक मासेमारी पद्धतीच्या जाळ्या विखुरलेल्या आहेत, त्या जागा सुरक्षित राहाव्यात.
- वादळात लोटस जेट्टी येथे कोळी आपल्या नौका नांगरत असतात, ते बंदर सुरक्षित रहावे.
कोस्टल रोडसाठी वरळी ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत समुद्रात भराव टाकला तर भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी वरळी कोळीवाड्यात आणि आजुबाजूच्या प्रदेशात शिरण्याची शक्यता आहे.
कोस्टल रोड हा विकासाचा महामार्ग ठरणार असला तरी त्यामुळे येणाऱ्या छुप्या संकटांचा सध्या अंदाजही लावला जाऊ शकत नाही.समुद्रात भराव टाकल्यानंतर भरतीच्या, वादळाच्या वेळी निर्माण होणारी परिस्थिती ही हजारो जीवांवर बेतणारी असू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)