(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाशी पुलावर माजी आमदारच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे जीव वाचला
नवी मुंबईतील वाशी पुलावर मराठवाड्यातील माजी आमदारच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचले.
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी पुलावर शनिवारी (22 मे) भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. मानखुर्द वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवून त्यांना समजावून पुलावरुन बाजूला केलं आणि मानखुर्द पोलिसांच्या हवाली केले. मात्र हा पूल वाशी पोलिसांच्या हद्दीत असल्याने या आमदार पत्नीला वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं.
एक महिला शनिवारी सकाळी दहा सुमारास वाशी पुलावर रडत उभी आहे, अशी माहिती मानखुर्द वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि हवालदार तुषार ढगे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ तिकडे धाव घेतली. ही 45 वर्षीय महिला घरातील जाचाला कंटाळून तिथे आत्महत्या करण्यासाठी आली होती, असं समजलं. यानंतर वाहतूक पोलिसांनी तिला समजावून मानखुर्द पोलीस ठाण्यात नेलं. मात्र हा पूल वाशी पोलिसांचा हद्दीत असल्याने या महिलेला वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
पोलिसांनी या महिलेच्या कुटुंबियांशी संपर्क केला असता, मराठवाड्यातील भाजपच्या माजी आमदाराच्या त्या पत्नी असल्याचं समोर आलं. घरातील जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं होतं. मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने त्यांचे प्राण वाचले आहेत.