प्लॅस्टिकबंदीमुळे अंधांना मिळाला रोजगार
प्लॅस्टिकबंदीमुळे अंध बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कापडी पिशव्या तयार करण्याचा व्यवसायाच्या माध्यमातून या अंध बांधवांना उपजीविकेचं हक्काचं साधन मिळालं आहे.
कल्याण : प्लॅस्टिकबंदीमुळे अंध बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. उच्चशिक्षित असूनही केवळ अंधत्वामुळे बेरोजगार असलेल्या अंध बांधवांनी कापडी पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून या अंध बांधवांना उपजीविकेचं हक्काचं साधन मिळालं आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारनं जाहीर केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर ठाण्यातील वांगणी येथील अंध बांधवांनी कापडी पिशव्या आणि कागदाचे बॉक्स तयार करण्याचं काम सुरू केलं. नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ डिसेबल्ड असोसिएशन आणि प्रयाग ट्रस्ट यांनी पुढाकार घेत 'जॉय स्किलक्राफ्ट' हा नवीन उद्योग सुरू केला. विशेष म्हणजे हा उद्योग सुरू करणारे किशोर गोहिल हे स्वतःसुद्धा अंध असून आपल्या बांधवांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.
या केंद्रात आधी मेणबत्त्या तयार करण्याचं काम सुरू होतं. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामुळे व्यवसायाची मोठी संधी अंध बांधवांना उपलब्ध झाली.
ख्रिस्तिना या तरुणीचा या व्यवसायाच्या उभारणीत मोठा वाटा आहे. कधीकाळी कॉर्पोरेटमध्ये मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या ख्रिस्तिनाने नोकरी सोडून सामाजिक संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. याठिकाणी काम करून आपल्याला मोठं मानसिक समाधान मिळत असल्याचं ख्रिस्तिनाने सांगितले.
वांगणीत स्वस्तात घरं मिळत असल्यानं काही वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात अंध बांधव येथे आले आहेत. मात्र उपजीविकेचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर त्यांच्यापुढे भीक मागण्याशिवाय कुठलाही मार्ग उपलब्ध नव्हता. आता मात्र सरकारच्या एका निर्णयामुळे त्यांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून स्वाभिमानानं जगताही येत आहे.