Konkan : कोकणातील गावं बनणार 'सर्वोत्तम पर्यटन गावं', UNWTO कडून होणार मूल्यांकन
कोकणातील दुर्लक्षित गावांना आता ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली असून या गावांचे यूनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या ( UNWTO) माध्यमातून मूल्यांकन करण्यात येणार आहे.
रायगड: कोकण म्हटलं की नजरेसमोर येतात ती नारळी, फोफळीची झाडं, निसर्गसंपन्न गाव आणि अथांग समुद्रकिनारा. यामुळे, सुट्टी म्हटली की अनेक पर्यटक हे कोकणात जात असतात. यामुळे या गावांना त्यांचा दर्जा मिळवून देत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनमार्फत त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी ठराविक निकषांच्या आधारे या गावांना मूल्यांकन करत या गावांना ' सर्वोत्तम पर्यटन गाव' म्हणून ओळख निर्माण करता येणार आहे.
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले कोकण हे निसर्गाने संपन्न असलेले गाव. यामध्ये, कोकणातील पश्चिम किनारपट्टीवर असलेले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले हे कोकणाचे विशेष आकर्षण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेले किल्ले रायगड हे जगभरातील शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे. तर, महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे, श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर, मुरूड येथील जंजिरा किल्ला यांची ओळख निर्माण झाली आहे. तर, रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेले अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन हे तालुके समुद्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे अवघ्या एक ते दोन दिवसाची सुट्टी घालवण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे येथील अनेक पर्यटक हे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. या तालुक्यातील पर्यटन व्यवसायावर आधारित अनेक उद्योगधंद्यांना याचा आर्थिक नफा होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिर आणि थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे तिथे असलेल्या मिनीट्रेनमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच, गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले पेण तालुक्यातून जगभरात हजारो मूर्त्या पाठविला जात असल्याने पेण तालुक्याची विशेष अशी ओळख निर्माण झाली आहे. यामुळे, कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावांना त्यांची ओळख निर्माण करण्याची संधी या योजनेमार्फत मिळणार आहे.
त्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची युएनडब्ल्यूटीओच्या सल्लागार मंडळामार्फत मूल्यांकन केले जाणार आहे. यात, नैसर्गिक व सांस्कृतिक साधनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख, जतन आणि प्रसिद्धीसाठी उपायोजना, प्लॅस्टिक वापरावर नियंत्रण, रस्ते, सुविधा व आधुनिक संपर्क साधने, आरोग्य आणि सुरक्षितता, नैसर्गिक आपत्ती निवारण योजना या मुद्द्यांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. तसेच, आपल्या गावाचे नाव जागतिक पातळीवर मिळण्यासाठी जास्तीत जास्त गावाने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.