सरनाईकांचं मत हीच सच्चा शिवसैनिकाची भावना, भाजपची प्रतिक्रिया तर शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न असल्याचं काँग्रेसचं मत
Pratap Sarnaik Letter Bomb : शिवसेना नेते प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर आता त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर धुसफूस सुरु असताना सरनाईकांच्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय.
मुंबई : ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मोदींशी जुळवून घ्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आता त्यावर राज्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे तर प्रताप सरनाईकांनी मांडलेलं मत ही सच्चा शिवसैनिकाची भावना आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रताप सरनाईकांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, याच्याशी आमचे काही घेणं-देणं नाही. त्यामुळे काँग्रेसने या मुद्द्यावर मत व्यक्त करण्याची गरज नाही."
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी काल भाषणामध्ये स्वबळाबद्दल मत व्यक्त केलंय. ते जसे मुख्यमंत्री आहेत तसेच शिवसेनेचे नेते देखील आहेत. शिवसेना देखील स्वबळाची भाषा करत असते. आम्ही याबद्दल काही मत व्यक्त केलं ती लगेच सामनामधून संजय राऊत अग्रलेख लिहितात. सत्ता गेल्यामुळे आमच्या पोटात दुखतय असं ते म्हणतात. प्रताप सरनाईक यांनी मांडलेलं मत हीच सच्चा शिवसैनिकाची भावना आहे. हेच आम्ही त्यांना 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो. तुम्ही जे काही करत आहात ती आघाडी अनैतिक आहे किंवा अनसायंटिफिक आहे. काँग्रेसची भूमिका ही अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याची राहिलेली आहे आणि आता तुम्ही तेच करत आहात. टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहात. पण आम्ही असं म्हटलं की लगेच आमच्यावर टीका केली जातेय."
शिवसेना कमकुवत करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा मोदींशी जुळवून घेतलेलं बर होईल, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला आहे. केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी काही मंत्र्यांची केंद्राशी हातमिळवणी सुरु आहे, असा आरोपही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.
काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर धुसफूस सुरु असताना सरनाईकांच्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Pratap Sarnaik Letter Bomb : काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते फोडतायेत; आमदार प्रताप सरनाईक यांचा 'लेटरबॉम्ब'
- हिंमत असेल तर मैदानात या, वैभव नाईकांचे नितेश राणेंना आव्हान तर मैदान तुमचं, वेळ जाहीर करा, भाजपचं प्रतिआव्हान
- Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटील यांची पुनर्विचार याचिका