Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
Pune Accident News: चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला.
पुणे: पुण्यातील (Pune) चाकण-शिक्रापूर महामार्गावर कंटेनर चालकाने हैदोस घातला. तब्बल वीस किलोमीटर पोलिसांनी या कंटेनर चालकाचा पाठलाग केला. या दरम्यान अनेक वाहनाला कंटेनर चालकाने धडक दिली. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) देखील कैद झाला आहे. यात चौघे जखमी झाले आहेत, सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संतापलेल्या नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप ही दिला आहे.(Pune Accident News)
नेमकं काय घडलं?
या अपघाताची सुरुवात चाकणच्या माणिक चौकातून झाली. तिथं दोन महिलांना कंटेनरने उडवले. त्या भीतीपोटी तो सुसाट वेगाने पळ काढू लागला. काही अंतरावर त्याने एका मुलीच्या पायावरून गाडी घातली. त्यानंतर चाकण पोलिसांनी पाठलाग सुरु केला, हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला. वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता. पुढं शिक्रापूर पोलिसांची गाडी त्याला रोखण्यासाठी थांबली होती. मात्र, कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला ही धडक दिली. यात ट्रॅफिक वॉर्डन किरकोळ जखमी झाले आहेत. चाकण ते जातेगाव या वीस किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली.
कोणतीही जीवितहानी झाली नाही
या अपघाताने मोठा गदारोळ निर्माण झाला, अखेर नागरिकांनी कंटेनरला रोखले आणि चालकाला खाली खेचून बेदम चोप दिला. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला अन्...
चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरकडून गाड्यांना ठोकर दिल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी देखील पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत पुढे जात राहिला. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले. या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आला आहे.
चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केला असल्याची माहिती समोर आली आहे.या कंटेनरने उडवलेल्या गाड्यामुळे आणि झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला आहे. शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे.