Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी या मार्गाला विरोध करत आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी महामार्गाचा नवा पर्याय देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला आहे.
Shaktipeeth Expressway : केंद्र आणि राज्य सरकारचा प्रस्थावित असणारा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्ग सांगलीपर्यंतच असून महामार्गाचा नवीन पर्याय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितला असल्याचे म्हटले आहे. महामार्गावरून संकेश्वरमार्गे गोव्याला जाता येईल, असा प्रस्ताव दिल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
सांगलीपर्यंत विरोध करण्याचे कारण नाही
राज्य सरकारचा महत्वकांक्षी निर्णय असलेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात विरोध कायम आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यावरून हे पुन्हा सिद्ध झालं आहे. सांगलीपर्यंत येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आपण विरोध करायचं कारण नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यात हा शक्तीपीठ महामार्ग येणार नाही असं मुश्रीफ म्हणाले. कोकणातील बांधा ते वर्धा असा एकूण 865 किलोमीटरचा आणि 86 हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग आहे. या महामार्गासाठी 12 जिल्ह्यातील 27 हजार 571 एकर जमीन हस्तांतरित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी या मार्गाला विरोध करत आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्गाचा नवा पर्याय देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला आहे.
सांगलीकरांचा विरोध नाही कोणत्या आधारावर?
सांगलीमध्ये शक्तिपीठ महामार्गाला कुणाचाही विरोध नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील दाखला दिला आहे. मात्र, सांगलीतील शेतकरी देखील या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. त्यामुळे सांगलीकरांचा विरोध नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणतं हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढा उभा करणारे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमिकेवर टीका केली आहेय शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवला जाणार याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विरोध जुगारून शक्तिपीठ महामार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मोठा लढा उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्य सरकार कशी समजूत काढत हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावे बाधित
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावे शक्तीपीठ महामार्गाच्या कामामध्ये बाधित होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक भूदरगड तालुक्यातील 21 गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल कागल तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील 10 गावांचा समावेश आहे. शिरोळ, आजरा, हातकणंगले तालुक्यामधील पाच गावांचा समावेश आहे. त्यामुळे या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आता पुन्हा एकदा रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.
या महामार्गात होणारी बाधित होणारी गावे कोणती आहेत?
- शिरोळ तालुका - कोथळी, दानोळी, निमशिरगाव, तारदाळ
- हातकणंगले तालुका - तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली,
- करवीर तालुका - सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, वडगाव खेबवडे
- कागल तालुका - कागल, व्हनूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, सोनाळी कुरणी, निढोरी, व्हनगुत्ती
- भुदरगड तालुका - आदमापूर, वाघापूर, मडिलगे बुद्रुक, कूर, मडिलगे खूर्द निळपण, धारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, देवर्डे, कारिवडे
- आजरा तालुका - दाभिल, शेळप, पारपोली, आंबाडे, सुळेरान
सांगली जिल्ह्यात किती तालुक्यातील जमीन जाणार?
- कवठेमहांकाळ तालुका - घाटनांद्रे, तिसंगी
- तासगाव तालुका - डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव, कवठे
- मिरज तालुका - कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी
कसा असेल शक्तीपीठ महामार्ग?
राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्स्प्रेसवे असेल आठ हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे देण्यात आलं आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील.
इतर महत्वाच्या बातम्या