Maharashtra Rain : राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, काही भागात या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पावसाची गरज आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राती काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देम्यात आला आहे.
या भागात जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
कोकणासह विदर्भात जोरदार पाऊस
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. जुलै महिन्यात कोकणात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं अनेक भागात पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. काही ठिकाणी गावात पामी देखील शिरलं होतं. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर कमी आल्यानं मोठा पुराचा धोका टळला. तसेच विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं तिथंही पूरस्थिती निर्माण झाली होती. विदर्बातील यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच घरांचंही नुसकान झालं आहे. काही शेतकऱ्यांची जनावरेही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, अद्यापही काही भागात पावसाची गरज आहे. कारण अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
काही भागात चांगला पाऊस झालाआहे. त्यामुळं तेथील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला आहे. 178 तालुक्यांत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त, 130 तालुक्यांत 75 ते 100 टक्के आणि 58 तालुक्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. राज्यात 120 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या 85 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा इथं अधिक पेरणी झाली आहे. तर सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली या भागात कमी पेरणी झाली आहे. राज्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.