Maharashtra Rain : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस, 85 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस (Rain) कोसळत आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस (Rain) कोसळत आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात चांगली वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला आहे. 178 तालुक्यांत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त, 130 तालुक्यांत 75 ते 100 टक्के आणि 58 तालुक्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.
111 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी
राज्यात 120 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या 85 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा इथं अधिक पेरणी झाली आहे. तर सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली या भागात कमी पेरणी झाली आहे. राज्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. 111 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर कापसाची 96 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जास्तीच्या पावसामुळं पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केल्याची माहिती कृषी विभागानं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.
दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. 120.68 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात 96.62 लाख शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा
चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेला पाच वर्षासाठी मुदतवाढ
राज्यात नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेला सन 2027-28 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनेत 1920 कोटी 99 लाख इतक्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली असल्याची माहितीही कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: