BJP Jal Akrosh Morcha: फडणवीसांच्या 'जल आक्रोश मोर्च्या'त अटींचे उल्लंघन झाले का?; पोलिसांकडून आढावा घेणे सुरु
भाजपकडून काढण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्च्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. मोर्च्यावेळी देण्यात आलेल्या अटींच उल्लंघन झाल्याच सिद्द झाल्यास गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Bjp Morcha: औरंगाबाद शहरात दोनदिवसांपूर्वी भाजपकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यासाठी पोलिसांकडून 14 अटी टाकत परवानगी देण्यात आली होती. पण या मोर्च्यात अटींचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप विरोधीपक्षांनी केला आहे. त्यामुळे या मोर्च्यात अटींचे उल्लंघन झाले का? याचा आढावा पोलिसांकडून घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या सभेनंतर सुद्धा पोलिसांनी आढावा घेऊन गुन्हा दाखल केला होता.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी या मोर्च्याला रीतसर परवानगी सुद्धा दिली होती. पण मोर्च्याला परवानगी देताना औरंगाबाद शहर पोलिसांकडून 14 अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपच्या मोर्च्यात घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाले का? याचा आढावा पोलिसांकडून घेतला जात आहे. सोबतच जिल्हा प्रशासन, आयबी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी विविध स्रोतांकडून माहिती जाणून घेतली आहे. त्यामुळे मोर्च्याच्या आढावा घेतल्यानंतर पोलीस काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
गुन्हे दाखल करा: जलील
भाजपकडून काढण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्च्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी केली आहे. पाण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यावेळी वादग्रस्त विधान भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तर भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी दोन समाजात ततेढ निर्माण होईल असे विधान केल्याचा आरोप सुद्धा जलील यांनी केला आहे.
गर्दीच आकडा तपासले जात आहे...
भाजपकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यावेळी झालेल्या गर्दीचे वेगवगेळे आकडे सांगितले जात आहे. भाजपकडून मोर्च्यासाठी मोठी गर्दी जमवली असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले होते. मिळालेल्या माहितीनुसार या मोर्च्यासाठी 55 बस, 250 चारचाकी, 40 टेंपो 250 दुचाकी आणि वार्डनुसार क्रुझरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मोर्च्याला नेमकी किती गर्दी होती हे सुद्धा पोलिसांकडून तपासले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.