Maharashtra Latur Corona Crisis | लातूरमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे आणीबाणी, डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर
ऑक्सिजनअभावी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर उतरल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं. बार्शी रोडवरील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.
लातूर : राज्यभरात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून पुरवठा होणार असला तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली आहे. ऑक्सिजनअभावी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर उतरल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं.
लातूर शहरातील बार्शी रोडवरील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आज सकाळी रस्त्यावर ठिय्या मांडला. जर ऑक्सिजन मिळाले नाहीतर तर रुग्ण सिविल रुग्णालयाला पाठवून मी दवाखाना बंद करतो, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. तर रुग्णाचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. रडत रडत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
लेखी निवेदनानंतरही गांभीर्य नाही : डॉ. प्रमोद घुगे
दररोज 200 ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे. रात्री केवळ दहा सिलेंडर आम्हाला मिळाले. एका गॅस एजन्सीने आपल्या मर्जीतील रुग्णालयांना सिलेंडर दिले आहेत, परंतु आम्हाला एकाही सिलेंडरचा पुरवठा केलेला नाही, त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. याबाबत मी काल पालकमंत्र्यांना लेखी निवेदन दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊनही त्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही. आज सकाळपर्यंत केवळ चार सिलेंडर शिल्लक राहिले होते, फोनाफोनी करुन कसेबसे दहा सिलेंडर मिळाले. रुग्णालयात सध्या 44 रुग्ण आहेत. त्यापैकी आयसीयूमध्ये 30 रुग्ण आहेत. त्यामुळे दररोज 200 सिलेंडरची आवश्यकता आहे. या सगळ्या गोंधळात रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रमोद घुगे यांनी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. "ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर रुग्णाची जबाबदारी माझी नाही तर सरकारची असेल असं मी रुग्णांना सांगत आहे," असंही डॉ. घुगे म्हणाले.
लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आजमितीला जिल्ह्यात 16 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील अनेक रुग्ण अत्यवस्थ आहेत. जिल्ह्यात 40 पेक्षा जास्त खासगी रुग्णालय आहेत. इथे हजारो रुग्ण आहेत, मात्र आता ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणा हतबल आहे.