Maharashtra New Cabinet : मंत्रिपदासाठी कोकणातील नेत्यांमध्ये चुरस, 'या' नेत्यांची नावे चर्चेत
Maharashtra New Cabinet : एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोकणातील नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

Maharashtra New Cabinet : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे गटाने भाजपला साथ देत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर, आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झाली असून कोकणातील भरत गोगावले, उदय सामंत, दीपक केसरकर, प्रशांत ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोरांसह एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात एकूण 35 मंत्री असतील. त्यापैकी 12 बंडखोर आमदारांना मंत्री केलं जाऊ शकतं, तर 24 चेहऱ्यांना भाजपच्या कोट्यातून संधी मिळू शकते.
महाविकास आघाडीतील राज्य सरकारमधील शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुमारे 51 आमदारांनी राज्यातील राजकारणाला मोठा धक्का दिला. यामध्ये, शिवसेनेतील सुमारे 39 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. त्यातच, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी भाजपसोबत जाऊन सत्तास्थापन केली आहे. यामुळे या सत्तास्थापनेनंतर मंत्रिपदासाठी कोकणातील नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गातील भाजपचे असलेले नितेश राणे आणि बंडखोर गटातील दीपक केसरकर यांच्यात स्पर्धा आहे. तर, रत्नागिरीत उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यात स्पर्धा आहे. तर, रायगडमध्ये भरत गोगावले यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात असले तरी भाजपचे प्रशांत ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले अपक्ष आमदार महेश बालदी यांचे नावही चर्चेत आहे.
याचबरोबर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कालिदास कोळंबकर यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे लक्ष आहे. तर, कोकणातील उदय सामंत तसेच दादा भुसे हे मंत्री शिंदे यांच्या गटाकडे आहेत, तर भुसे यांच्याकडे पालघरचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. त्यामुळे, त्यांना ही संधी पुन्हा मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद 2014 च्या शिवसेना-भाजपच्या सत्तेत भाजपकडे होते, यावेळी प्रकाश मेहता आणि रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री होते. तर, एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले भरत गोगावले हे रायगडचे असल्याने येथेही भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच होईल असे चित्र आहे.
संबंधित बातम्या
Cabinet Expansion : शिंदेंच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मंत्र्यांना मिळणार संधी, जाणून घ्या संभाव्य यादी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
