(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cabinet Expansion : शिंदेंच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मंत्र्यांना मिळणार संधी, जाणून घ्या संभाव्य यादी
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात गेल्या सात वर्षात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांना संधी देण्याची शक्यता आहे.
Maharashtra Political Crisis : राज्यात नवीन सरकार आले आहे. एकनाथ शिंदेंनी सायंकाळी विधानभवनात त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक मंत्र्यांना संधी देण्याची शक्यता आहे.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात गेल्या सात वर्षात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत कमळ फुललं, नंतर त्याचा फायदा विधानसभेलाही झाला. चंद्रकांत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांना संधी देण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा
चंद्रकांत पाटील( कोथरुड विधानसभा, पुणे)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आता मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री देखील बनू शकतात.
माधुरी मिसाळ (पर्वती विधानसभा मतदारसंघ)
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार असलेल्या मिसाळ यांना मंत्रीपद देऊन पुण्याला प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते.
राहुल कूल- (दौंड विधानसभा मतदारसंघ)
राहुल कुल यांनी भाजपचे मित्रपक्षांसोबतचे जागावाटपाचे गणित सोडवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. पण महादेव जानकर यांच्याशी त्यांनी संबंध कधीच तोडले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबुती देण्यासाठी कुल यांच्या आमदारकीचा उपयोग होऊ शकतो.
महेश लांडगे (भोसरी विधानसभा मतदारसंघ)
भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले लांडगे पिंपरी-चिंचवड शहर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची खालावलेली प्रकृती पाहता महेश लांडगेंवर पक्षाची भिस्त राहणार आहे.
सोलापूर जिल्हा
रणजितसिंह मोहिते पाटील ( माळशिरस मतदारसंघ)
माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्याने तिथुन भाजपचे राम सातपुते आमदार आहेत. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिलीय. विजयसिंह मोहिते पाटील अनेक दशकांची शरद पवारांची साथ सोडून फडणवीसांच्या गोटात सामिल झाले. त्याचे बक्षीस रणजितसिंहाना मंत्रीपदाच्या स्वरुपात मिळू शकते.
सुभाष देशमुख
भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री देशमुख यांचा अनुभव पक्षाला उपयोगी ठरेल.
प्रशांत परिचारक
प्रशांत परिचारक सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्या आमदार बनल्याने पंढरपूर आणि परिसरात भाजपला फायदा होईल आणि ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल.
सातारा जिल्हा
जयकुमार गोरे
माण विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले गोरे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या सातारा जिल्ह्यात पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी गोरेंचा फायदा होईल. त्यांच्या रुपाने माळी समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळेल.
शिवेंद्रराजे भोसले
सातारा मतदारसंघातून आमदार असलेले शिवेंद्रराजे भोसले राजघराण्यातील आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप विस्तारासाठी उपयोग होऊ शकतो.
कोल्हापूर जिल्हा
प्रकाश आबिटकर
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून आबिटकर शिवसेनेकडून निवडून येतात.एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेले आबिटकर कोल्हापूर यांना बंडखोरीचे बक्षीस मिळू शकेल. भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी उपयोग होईल असा कयास.
सांगली जिल्हा
अनिल बाबर
खानापूर आटपाडी मतदारसंघातून निवडून येतात. एकनाथ शिंदेंच्या बंडात बाबर यांचा पुढाकार होता. बाबर आधी राष्ट्रवादीकडून निवडून यायचे. बाबर यांच्या रुपाने भाजपला या मतदारसंघात आयता उमेदवार मिळेल.
सुरेश खाडे
सांगली जिल्ह्यातील मिरज या राखीव मतदारसंघातून खाडे निवडून येतात. दलित समाजाला त्यांच्या रुपाने मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळेल.